आज रात्री ८.३० वाजता पंतप्रधान मोदी देशाला संबोधित करणार

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
नवी दिल्ली,
Modi will address the nation महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशातील राजकारण तापलेले असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ८.३० वाजता राष्ट्राला संबोधित करणार आहेत. लोकसभेत मांडण्यात आलेले महिला आरक्षणाशी संबंधित घटनादुरुस्तीचे प्रस्तावित कायदे मंजूर होऊ न शकल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीत हे संबोधन महत्त्वाचे मानले जात आहे. सरकारकडून संबोधनाचा नेमका विषय जाहीर करण्यात आलेला नसला तरी सध्याच्या घडामोडी पाहता या मुद्द्यावर ते भाष्य करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
 

Modi will address
 
मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधानांनी विरोधी पक्षांवर कठोर शब्दांत टीका केल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या मते, लोकसभेत प्रस्ताव नाकारला जाणे हे सरकारचे अपयश नसून देशातील महिलांच्या अधिकारांवर घाला घालण्यासारखे आहे. या मुद्द्याला त्यांनी थेट महिला सक्षमीकरणाशी जोडत विरोधकांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.बैठकीदरम्यान त्यांनी असेही मत व्यक्त केले की, या प्रस्तावाला पाठिंबा न देणे ही विरोधकांची मोठी चूक ठरली आहे. महिलांना आरक्षण देण्याबाबत खरोखरच बांधिलकी असती, तर त्यांनी गेल्या अनेक दशकांत ठोस पावले उचलली असती, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यामुळे विरोधी पक्षांच्या हेतूंवर शंका निर्माण होते, असे त्यांनी सुचवले.
 
 
पंतप्रधानांनी यावेळी इशारा देत सांगितले की, या मुद्द्यावर घेतलेल्या भूमिकेचे राजकीय परिणाम विरोधकांना भविष्यात भोगावे लागू शकतात. जनतेत या विषयाबाबत गंभीर भावना असून त्याचा परिणाम आगामी निवडणुकांवरही होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.महिलांविषयी विरोधी पक्षांची भूमिका नकारात्मक असल्याचा संदेश देशभर पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना केले. या विषयाची खरी बाजू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षातील आणि सरकारमधील नेत्यांनी सक्रियपणे काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या काही वर्षांत पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केलेली संबोधने प्रामुख्याने धोरणात्मक निर्णय, सुधारणा किंवा आपत्कालीन परिस्थितींशी संबंधित होती. मात्र यावेळी लोकसभेतील घटनादुरुस्ती प्रस्तावाच्या अपयशानंतरचे हे संबोधन वेगळ्या स्वरूपाचे ठरणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या या भाषणाकडे देशाचे लक्ष लागले आहे.