कोल्हापूर,
Pratap Sarnaik महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा येत्या १ जूनपासून प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणी दौऱ्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी त्यांनी एसटीच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नवीन बस दाखल करण्याचा निर्णयही जाहीर केला. या निर्णयामुळे राज्यातील एसटी सेवा अधिक सक्षम आणि व्यापक होणार असल्याचे त्यांनी सांगितले. बस स्थानकांवरील मूलभूत सुविधा सुधारण्यावर सरकारचा विशेष भर असून, प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोल्हापूर बस स्थानकाच्या पाहणीदरम्यान परिसरात स्वच्छता दिसून आल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच, मंत्री दौऱ्यामुळेच केवळ स्वच्छता केली जाते ही बाब गंभीर असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अशा प्रकारांमुळे प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याचे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच सुनावले.स्थानकातील कॅन्टीनच्या पाहणीवेळी खाद्यपदार्थांच्या दरपत्रकावर चिकटपट्टी लावून मूळ दर झाकल्याचा प्रकार समोर आल्यानंतर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. विभाग नियंत्रक अभय देशमुख आणि व्यवस्थापक अमृता ताम्हणकर यांना त्यांनी सार्वजनिकरित्या धारेवर धरले.
बस स्थानकांचा परिसर Pratap Sarnaik आणि स्वच्छतागृहे केवळ अधिकाऱ्यांच्या दौऱ्यापुरती मर्यादित न राहता कायमस्वरूपी स्वच्छ राहावीत, यासाठी दर चार तासांनी स्वच्छता करणे बंधनकारक करण्यात येणार असल्याचे निर्देशही त्यांनी दिले. प्रवाशांना मिळणाऱ्या सेवांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.याशिवाय, गरजू प्रवाशांसाठी ३० रुपयांत नाश्ता उपलब्ध करून देण्याची योजना सुरू करण्याचे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी दिले. प्रवाशांकडून बस भाड्याच्या माध्यमातून स्वच्छता कर आकारला जात असल्याने, त्या निधीचा वापर एसटी महामंडळ स्वतःच करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.कोल्हापूर जिल्ह्यात शासन निधीतून बांधण्यात आलेल्या चार नवीन बसस्थानकांच्या उद्घाटनासाठी मंत्री सरनाईक कोल्हापुरात आले होते. यावेळी त्यांनी मध्यवर्ती बस स्थानकासह विविध सुविधांची पाहणी करून प्रशासनाला आवश्यक सुधारणा तातडीने करण्याचे निर्देश दिले.