लिलावद्वारे पार पडणार प्रक्रिया
पालकमंत्र्यांनी दर्शविली सहमती
अमरावती,
Municipal Commercial Complex महापालिकेच्या उत्पन्नवाढीसाठी व्यापारसंकुलातील गाळ्यांचा लिलाव करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सकारात्मकता दर्शविली आहे. त्यामुळे भाडेवाढीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. यासोबतच मालमत्ता कराची आकारणी कोणत्या दराने करायची, यासंदर्भातील निर्णय सभागृहाने घ्यावा व तो प्रस्ताव शासनाला पाठवावा, त्यावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठकीत दिली.
महापालिकेच्या विकासकामांचा व कारभाराचा आढावा शनिवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला. यावेळी महापौर श्रीचंद तेजवाणी, आमदार सुलभा खोडके, आमदार संजय खोडके, आमदार रवी राणा, उपमहापौर सचिन भेंडे, सभागृह नेते चेतन गावंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर यांच्यासह सत्ताधारी गटातील गटनेते उपस्थित होते. एकूण २२ मुद्दांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये अंबादेवी-एकवीरादेवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा ‘ब’ दर्जा देणे, टाऊन हॉल व नवीन इमारतीचे बांधकाम, छत्री व वडाळी तलाव सौंदर्यीकरण, शिवसृष्टी विकसित करणे, जवाहर गेट व परकोट दुरुस्ती, सोलर प्रकल्प अशा मुख्य मुद्दांचा समावेश होता.
Municipal Commercial Complex महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत मर्यादित असल्याने ते वाढविण्यासाठी आवश्यक पर्यायांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. यामध्ये विशेषतः वर्ष २०२८ पासून रखडलेल्या व्यापारसंकुलातील गाळ्यांच्या भाडेवाढीचा मुद्दा केंद्रस्थानी होता. पालकमंत्र्यांनी त्यावर तीन पर्यायांपैकी जाहीर लिलाव करण्यास सकारात्मकता दर्शविली. अन्य पर्यायामध्ये ०.७ टक्के दराने भाडेवाढ व पुनर्बांधनी करणे यांचा समावेश होता. मात्र दोन्ही पर्याय क्लिष्ट असल्याने लिलाव करण्यास पालकमंत्र्यांनी सहमती दर्शवून तसा प्रस्ताव आमसभेत मंजूर करून शासनाला पाठविण्याची सूचना केली. मालमत्ता कराची आकारणी कोणत्या दराने करावी, यासंदर्भातही आमसभेत चर्चा करून निर्णय घेण्याची सूचना पालकमंत्र्यांनी बैठकीत केली. महापालिकेने केलेल्या सुधारित कर आकारणीस स्थगिती देण्यात आली आहे. ही स्थगिती हटविण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक घेण्यास सहमती दर्शवतानाच त्यांनी आमसभेचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिलेत.