गोंदिया,
naxalites new life start हिंसेच्या अंधार वाटेतून बाहेर पडत शांततेच्या प्रकाशाकडे वाटचाल करणाऱ्या १५ पूर्वाश्रमीच्या नक्षलवाद्यांनी हातातील बंदूक त्यागत कलाकुसरीची साथ धरली आहे. शुक्रवारी १७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्या हस्ते त्यांना आत्मसमर्पण प्रमाणपत्र बहाल करण्यात आले. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या या नक्षल्यांनी नवजीवनाचा कायदेशीर 'आरंभ' केला. या सोहळ्याने केवळ प्रशासनिक प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर हिंसेच्या चक्रातून मुक्त होण्याचा मानवी संघर्ष आणि नव्या आयुष्याला सुरुवातही झाली आहे.
काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेश–महाराष्ट्र–छत्तीसगड झोनचे माजी प्रवक्ते विकास उर्फ अनंत नागपूरे यांच्यासह १५ नक्षलवाद्यांनी गोंदिया पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. दरम्यान, शुक्रवारी स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयात छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करून त्यांना आत्मसमर्पण प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. गोंदावले यांनी सर्व आत्मसमर्पितांना सनदशीर मार्गाने जगण्याची व नवी सुरुवात करण्याचे आवाहन केले. ही नवी पहाट तुमच्या आयुष्यात उजाडली आहे; तिचा सकारात्मक उपयोग करून स्वतःचे आणि कुटुंबाचे भविष्य घडवा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले. सोहळ्यात पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे तसेच गुप्तवार्ता विभागातील अधिकारी उपस्थित होते.naxalites new life start यावेळी, समर्पित नक्षलवाद्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. ही कृती केवळ औपचारिक नव्हे तर हिंसेचा मार्ग सोडून कायदेशीर चौकटीत जीवन जगण्याचा निर्णय घेतलेल्या या व्यक्तींना पुनर्वसनाच्या विविध योजना उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही प्रशासनाने या माध्यमातून दिली. प्रसंगी समर्पित नक्षलवाद्यांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांनी दिली. त्याचबरोबर त्यांचे आधारभूत कागदपत्रे तयार करण्याचे कामही प्राधान्याने केले जात असल्याचे सांगत घरकुल, शिक्षण, रोजगाराभिमुख प्रशिक्षण आणि आर्थिक सहाय्य अशा विविध माध्यमांतून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा व्यापक आराखडा शासनाने तयार केला असल्याचे सांगितले.
बंदुक सोडून कलाकुसरीची साथ...
विशेष म्हणजे समर्पित नक्षलवाद्यांनी हातातील बंदूक त्यागत कलाकुसरीची साथ धरली असून स्वतः तयार केलेली बांबूची कलाकृती जिल्हाधिकारी आणि इतरही अधिकाऱ्यांना भेट म्हणून दिली. बंदुकीऐवजी हाती आलेली ही कलाकुसर त्यांच्या जीवनातील बदलाची साक्ष देत होती.
शांततेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ...
गोंदियातील हा समर्पण सोहळा केवळ प्रशासनिक घटना न राहता मानवी पुनर्जन्माचा, सामाजिक समन्वयाचा आणि शांततेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ ठरला असून हिंसेच्या अंधारातून बाहेर पडणाऱ्या १५ स्त्री-पुरुष नक्षल्यांचा सहभाग उल्लेखनीय आहे.