नवी दिल्ली
Prakash Raj अभिनेते प्रकाश राज हे पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले असून, यावेळी त्यांनी ‘रामायण’ संदर्भात केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. एका सार्वजनिक कार्यक्रमात रामायणाची कथा वेगळ्या पद्धतीने मांडताना त्यांनी राम आणि लक्ष्मण यांनी रावणाच्या बागेतून फळं खाल्ल्याचा उल्लेख केला. या वक्तव्यावरून सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, त्यांच्या विरोधात गुन्हेगारी तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
कार्यक्रमादरम्यान राम, लक्ष्मण आणि सीता दक्षिणेकडे जात असताना भूक लागल्याने त्यांनी एका शेतातील फळं खाल्ल्याची कथा प्रकाश राज यांनी सांगितली. पुढे त्यांनी रावण आणि शूर्पणखा यांच्यासोबतचा संवाद विनोदी आणि उपरोधिक पद्धतीने मांडला. या कथेत त्यांनी जीएसटी, सवलत आणि उत्तर-दक्षिण वादाशी संबंधित मुद्द्यांची जोड देत सामाजिक भाष्य करण्याचा प्रयत्न केला.
या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत काही नेटकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. विशेषतः रामायणासारख्या पवित्र मानल्या जाणाऱ्या ग्रंथाबाबत अशा प्रकारे भाष्य करणे अयोग्य असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, वकील Prakash Raj अमिता सचदेवा यांनी या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या साऊथ डिस्ट्रिक्ट सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या मते, या वक्तव्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या असून कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीनंतर या प्रकरणाला अधिकृत वळण मिळाले असून, पुढील चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रकाश राज यांनी यापूर्वीही विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर स्पष्ट भूमिका घेतली आहे. स्वतःला नास्तिक मानणारे प्रकाश राज अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत. मात्र यावेळी ‘रामायण’वरील त्यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद अधिक तीव्र होताना दिसत आहे.