ओलिताच्या सानिध्यात पर्जन्यमापक यंत्र

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
आकडेवारीची तफावत
शेतकर्‍यांसाठी तोट्याचे संकेत
 
पथ्रोट, 
Pthrot : Temperature मागील काही दिवसापासून तापमानाचा आकडा वाढता आहे. दूरदर्शन, सोशल मीडिया व वृत्तपत्राच्या माध्यमातून वाढत्या आकडेवारीनुसार खबरदारीच्या सूचना घेण्याबाबत माहिती प्रसारित होत आहे. अशातच शासनाने मंडळनिहाय बसविलेल्या पर्जन्यमापक यंत्रापैकी पथ्रोटचे पर्जन्यमापक यंत्र हे ओलिताच्या सानिध्यात असल्यामुळे इतर मंडळांच्या तुलनेत तापमानाच्या आकडेवारीत फरक दिसून येत आहे. हा फरक हवामान आधारित विमा कंपनीकडे वर्ग करण्यात येत असल्यामुळे पुढे त्यांच्याकडून मिळणारी मदतही शेतकर्‍यांसाठी तोट्याची ठरणार आहे.
 
 
Rain gauge
 
Pthrot : Temperature  शासनाकडून निर्धारित केलेल्या मंडळात परतवाडा, देवमाळी, परसापूर, पथ्रोट, रासेगाव व असदपूर अशा सहा ठिकाणी पर्जन्यमापक यंत्र बसविण्यात आले आहे. तापमानाची आकडेवारी या पर्जन्यमापक यंत्रामध्ये मोजल्या जाते. तेथून ती थेट शासन दरबारी पोहोचविली जाते. मग ती आकडेवारी शासन दरबारातून विमा कंपनीकडे वर्ग करण्यात येते. त्यावेळी शेतकर्‍यांना हवामान आधारित पीक विमा मंजूर करताना या आकडेवारीवरून मदत देण्याचे निकष ठरविले जातात. ज्या पर्जन्यमापक यंत्रावरील आकडेवारी अधिक उष्णतामानाची आहे, तिथे मदत मंजूर केली जाते. परंतु फक्त ओलीत क्षेत्राच्या सानिध्यात असलेल्या पर्जन्यमापक यंत्रामुळे जर का आकडेवारीची नोंद कमी होत असेल तर शेतकर्‍यांना विमा कंपनीची हक्काची मदत मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. शुक्रवारी बारा वाजून त्रेपन मिनिटांनी पथ्रोट येथे तापमानाचा आकडा हा ३७ डिग्री सेल्सिअस होता. त्यानंतर दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये परतवाडा, देवमाळी ४० डिग्री, परसापूर ४२ डिग्री, रासेगाव व असदपूर येथे ४१ डिग्री सेल्सिअसची नोंद घेण्यात आली.
 
 
वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊ
-पर्जन्यमापक यंत्र लावण्यात आलेल्या ठिकाणी तापमानाच्या नोंदी घेऊन आकडेवारीमध्ये कसा व किती फरक आहे व त्यासाठी काय उपाययोजना करावी लागणार, याकरिता वरिष्ठ अधिकार्‍यांचे मार्गदर्शन घेण्यात येईल, असे हवामान विभागाचे तंत्रज्ञ अधिकारी गौरव बोके यांनी तभाशी बोलताना सांगितले.