पुणे
Pune medical negligence case वैद्यकीय उपचारांदरम्यान झालेल्या कथित निष्काळजीपणामुळे ११ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी संबंधित रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांविरुद्ध सहकारनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवी पेठेतील एका खासगी रुग्णालयात उलटी आणि आजाराच्या तक्रारीसह या बालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान योग्य ती काळजी न घेतल्याचा तसेच चुकीच्या पद्धतीने उपचार करण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर बालकाची प्रकृती अधिकच खालावली आणि काही दिवसांतच त्याचा मृत्यू झाला.या प्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयातील तज्ज्ञ समितीकडे सोपवण्यात आली होती. समितीच्या अहवालानंतर वैद्यकीय निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी संबंधित डॉक्टर आणि नर्सांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
या घटनेनंतर कुटुंबीयांनी Pune medical negligence case गंभीर आरोप करत न्यायाची मागणी केली आहे. तर पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला असून, सर्व वैद्यकीय कागदपत्रे आणि उपचार पद्धतीची सखोल चौकशी केली जात आहे. पुढील तपास सुरू असून, दोष सिद्ध झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा वैद्यकीय सेवांतील जबाबदारी आणि रुग्ण सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. शहरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू असून, आरोग्य व्यवस्थेतील त्रुटींवर लक्ष देण्याची मागणीही जोर धरत आहे.