ऐन उन्हाळ्यात शिष्यवृत्तीची परीक्षा, शाळा मात्र बंद!

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
मुंबई,
Scholarship exam in the middle of summer राज्यातील शिक्षण व्यवस्थेतील विस्कळीत कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र लाटेत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय मोठ्या टीकेचा विषय ठरत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार २४ एप्रिल रोजी ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून त्या दिवशी तापमान मोठ्या प्रमाणात वाढलेले असतानाही सकाळपासूनच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लहान विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना उन्हाचा मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.
 
 
Scholarship exam in the middle of summer
 
 
या परीक्षेचे दोन टप्पे ठेवण्यात आले असून सकाळी अकरा ते साडेबारा या वेळेत पहिला पेपर होणार आहे, तर दुपारच्या कडक उन्हात दोन ते साडेतीन या वेळेत दुसरा पेपर होणार आहे. अनेक ठिकाणी परीक्षा केंद्रे विद्यार्थ्यांच्या घरापासून लांब अंतरावर असल्याने त्यांना प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे उष्णतेच्या झळा सहन करत परीक्षा देण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येणार असून पालकांनाही मुलांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. राज्यातील काही भागांत उन्हाच्या तीव्रतेमुळे शाळांना आधीच सुट्ट्या जाहीर करण्यात आलेल्या असताना अशा परिस्थितीत परीक्षा घेण्याचा निर्णय असंवेदनशील ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
दरम्यान, शासनाने घेतलेल्या पूर्वीच्या निर्णयांमुळेही गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. यापूर्वी पाचवी आणि आठवीसाठी असलेल्या परीक्षांची रचना बदलून ती चौथी आणि सातवीसाठी लागू करण्यात आली. त्यामुळे यंदा काही विद्यार्थ्यांना परीक्षा दोन वेळा द्यावी लागत असल्याचे चित्र आहे. या बदलांमुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त ताण पडत असून शिक्षण विभागाच्या नियोजनाबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचबरोबर, मुंबईतील अनेक शाळांच्या मान्यतेचा प्रश्नही गंभीर बनला आहे. महानगरातील तब्बल १६४ शाळा अद्याप अनधिकृत असल्याचे समोर आले असून त्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य अनिश्चिततेत आहे. काही शाळांना मान्यता देण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी संबंधित प्रस्ताव दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.