उंद्री धरण परिसरात चोरट्यांचा धुडगूस

१० शेतकर्‍यांचा केबल लंपास

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
undri dam area तालुक्यातील उंद्री धरण परिसरात चोरट्यांनी अक्षरशः धुडगूस घालत १० शेतकर्‍यांच्या उंद्री धरणावरील मोटार पंपांना जोडलेले विजेचे केबल चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली. या प्रकारामुळे शेतकर्‍यांच्या सिंचन व्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
 
 

undri dam area
 
मिळालेल्या माहितीनुसार, बांबर्डा व कुपटी वापटी येथील गौरव कानकीरड, वैभव कानकीरड, दिगंबर राऊत, गोपाल भेंडे, प्रवीण काचगुंडे, स्वप्निल कानकीरड, धर्माजी तायडे, बाळू वानखडे, प्रविण टाके आणि उमेश भेंडे या शेतकर्‍यांच्या शेतातील प्रत्येकी सुमारे २०० ते ३०० फूट लांबीचे केबल चोरट्यांनी रात्रीच्या अंधारात चोरून नेले.या चोरीमुळे शेतकर्‍यांची मोटार बंद पडली असून, पिकांना पाणी देणे थांबले आहे. सध्या वाढत्या उन्हामुळे आधीच पाण्याची टंचाई भासत असताना ही घटना घडल्याने शेतकर्‍यांच्या अडचणीत मोठी भर पडली आहे. विशेषतः उन्हाळी पिके व भाजीपाला यावर याचा तात्काळ परिणाम होत असल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.प्रत्येक शेतकर्‍याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून, नवीन केबल खरेदी करणे ही मोठी आर्थिक कसरत ठरत आहे. आधीच शेतीमालाला कमी दर, खत - औषधांचे वाढते दर आणि नैसर्गिक संकटांचा सामना करत असलेल्या शेतकर्‍यांसाठी हा अतिरिक्त भार ठरत आहे. उंद्री धरण परिसरात यापूर्वीही किरकोळ चोरीच्या घटना घडल्या असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, आता मोठ्या प्रमाणावर केबल चोरी होत असल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत.undri dam area रात्रीच्या वेळी शेतात जाणे धोकादायक वाटत असल्याचेही काहींनी व्यक्त केले. दरम्यान, या घटनेमुळे उंद्री धरण परिसरातील शेतकर्‍यांत संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरात लवकर चोरट्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
पोलिसात तक्रार दाखल
कारंजा तालुयातील उंद्री धरण परिसरात मागील आठवड्यात दहा शेतकर्‍यांचे केबल चोरी गेले त्यामुळे शेतकर्‍यांचे सिंचन प्रभावित झाले परिणामी शेतकरी संकटात सापडले. या संदर्भात सदर शेतकर्‍यांनी कामरगाव पोलिस चौकीत तक्रार दाखल केली.त्यानंतर घटनास्थळाची पाहणी पोलिसांकडून करण्यात आली. परंतु अद्याप पर्यंत चोरट्यांचा शोध मात्र लागला नाही.