जिर्ण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवा संघर्ष मोर्चाचा रास्ता रोको

*अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

    दिनांक :18-Apr-2026
Total Views |
देवळी,
road for repair morcha देवळी ते दिघी या मार्गावरील रेल्वे स्टेशनजवळील अंडरपास रस्ता अत्यंत खराब व जिर्णावस्थेत आहे. या रस्त्यावरून महालक्ष्मी स्टील कंपनी पॉवर प्लांटच्या कोळशाची जड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असून रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्या नेतृत्वात शेतकरी व दिघी येथील गावाकर्‍यांनी देवळी ते दिघी रस्त्यावरील अंडरपासखाली दोन तास रस्तारोको आंदोलन केले. दरम्यान, सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण मुत्तेलवार यांनी आंदोलनस्थळ गाठून नगराध्यक्ष किरण ठाकरे, सरपंच संदिप दिघीकर, गौरव खोपाळ, प्रवीण खाडे यांच्याशी चर्चा करून त्वरित रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याचे आश्वासन दिले.
 

जिर्ण रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युवा संघर्ष मोर्चाचा रास्ता रोको 
 
 
या खराब रस्त्यामुळे शेतकरी, गावकरी, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी खड्डे पडले असून अपघात देखील झाले आहेत. भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शयता देखील वाढली आहे. विशेषत: पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होणार आहे. सदर रस्त्याची तात्काळ पाहणी करून दुरुस्तीची कामे हाती घ्यावी, जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल व संभाव्य अपघात टाळता येईल, अशी मागणी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्यासह नागरिकांनी सा. बां. विभागाचे कार्यकारी अभियंता अरुण मुत्तेलवार यांच्याकडे केली.
 
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे येत असलेल्या रस्त्याच्या डागडुजीचे काम त्वरित सुरू करू व रेल्वे विभागाकडे येत असलेल्या रस्त्याच्या कामासंदर्भात रेल्वे विभागाशी आजच संपर्क करून त्यांच्याशी बैठक लावून ते काम सुद्धा मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकार्‍यांनी दिले. आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्याची विनंती केली.road for repair morcha यावेळी किरण ठाकरे यांनी या गंभीर बाबीकडे तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई न केल्यास रेल रोको आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशाराही त्यांनी देत आंदोलन तात्पुरते स्थगित केले.
 
यावेळी नगराध्यक्ष किरण ठाकरे यांच्यासह सरपंच संदिप दिघीकर, प्रवीण कात्रे, गौरव खोपाळ, प्रवीण खाडे, मंगेश वानखेडे, मधुकर खाडे, विठ्ठल लाकडे, पियुष लाटकर, अनिल गुजरकर, हरिभाऊ पाटणकर, रमेश काकडे, मनोहर खाडे, दीपक खाडे, संजय गवते, बालू तायवाडे, सुभाष सुरकार, सचिन मेघळ, महेश खोलाडे, महेश कुंडलवार, सचिन देशमुख, यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.