यवतमाळ,
समाजातील उपेक्षित, बेघर आणि निराधार मनोरुग्णांसाठी अविरतपणे कार्य करणार्या नंददीप फाउंडेशनच्या सेवायात्रेत एक भावनिक, अत्यंत प्रेरणादायी क्षण नोंदवला गेला. शिक्षक व मार्गदर्शक Gajanan Wankhade गजानन वानखडे यांनी आपल्या अंतःकरणातून उमटलेल्या सेवाभावनेतून स्वतःची पॅशन प्रो दुचाकी नंददीप फाउंडेशनला विनामूल्य अर्पण केली. ही देणगी केवळ एक वाहन नसून, ती आहे निस्वार्थ भावनेची जिवंत साक्ष. ती आहे विश्वास, आपुलकी आणि माणुसकीचा सुंदर संगम विशेष म्हणजे, ही घटना गुरुवारी गजानन महाराजांच्या पावन दिवशी घडली. फाउंडेशनच्या मते, जेव्हा सेवेसाठी गरज निर्माण होते, तेव्हा माऊली स्वतः मार्ग काढते, आणि आज त्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
फाउंडेशनला दैनंदिन सेवाकार्यासाठी विशेषतः पाणीपुरवठा, रुग्णांची देखभाल आणि विविध कामांसाठी दुचाकीची अत्यंत गरज होती. अशावेळी वानखडे यांनी कोणताही दिखावा न करता, एक साधा फोन करून आपली गाडी अर्पण करण्याचा निर्णय घेतला. माझी गाडी घेऊन जा, सेवाकार्यात उपयोगी पडेल’ या साध्या शब्दांत व्यक्त झालेली भावना मात्र अत्यंत मोठी होती.
सुमारे ४० ते ५० हजार रुपये किंमतीची ही गाडी विकण्याऐवजी, ती समाजकार्यासाठी दान देण्याचा निर्णय हा त्यांच्या विशाल मनाचा आणि सेवाभावाचा प्रत्यय देणारा आहे. नंददीप फाउंडेशनचे संस्थापक संदीप शिंदे आणि Gajanan Wankhade वानखडे यांच्यातील २५ अधिक काळ स्नेह आणि विश्वास या देणगीतून अधिक दृढ झाला आहे. एका साध्या परिचयातून निर्माण झालेलं हे नातं आज समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. सध्या नंददीप फाउंडेशन २०० हून अधिक बेघर मनोरुग्णांची सेवा करत असून ७५० पेक्षा जास्त जणांचे यशस्वी पुनर्वसन केले आहे. या कार्यात समाजातील दात्यांचा सहभाग हीच खरी असल्याचे फाउंडेशनकडून सांगण्यात आले.
‘देणार्याने देत जावे, घेणार्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस, देणार्याचे हात घ्यावे’
या ओळींना साजेसं उदाहरण म्हणजे वानखडे सरांचे हे योगदान होय. वानखडे, त्यांचे सुपूत्र कार्तिक वानखडे आणि संपूर्ण वानखडे परिवार यांचे या कार्यासाठी मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. त्यांच्या या देणगीमुळे अनेक गरजू जीवनात सकारात्मक बदल घडणार आहे. आपल्या छोट्याशा मदतीतून एखाद्याच्या आयुष्याला नवी दिशा मिळू शकते. चला, आपणही या सेवायज्ञाचा भाग बनूया, असे आवाहन नंददीप फाउंडेशनने समाजातील सर्व दात्यांना केले आहे.