अक्षयं भवति भारत सर्वमेव....

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
 
प्रासंगिक. ..
 
डॉ. भालचंद्र माधव हरदास

 

अस्यां तिथौ क्षयमुर्पति हुतं न दत्तं।
तेनाक्षयेति कथिता मुनिभिस्तृतीया।।
उद्दिष्य दैवतपितृन्क्रियते मनुष्यैः।
तत् च अक्षयं भवति भारत सर्वमेव।।
akshaya tritiya श्रीकृष्ण म्हणतात हे युधिष्ठिरा, या तिथीस केलेले दान आणि हवन क्षयाला जात नाही; म्हणून हिला मुनींनी ‘अक्षय्य तृतीया’ असे म्हटले आहे. देव आणि पितर यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय -अविनाशी होते. अक्षय्य तृतीया हिंदू संस्कृतीतील विशेष उत्सव आहे. हिंदू पंचांगानुसार वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तिसऱ्या दिवशी अक्षय्य तृतीया तिथी येते. या सणाला आखा तीज, आखाजी, अख्खा तीज या नावानेही अनेक प्रांतात संबोधले जाते. समस्त भारतवर्षात मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. अक्षय्य तृतीयेला अनेक पौराणिक आणि ऐतिहसिक घटना जोडल्या गेल्या असल्याने या सणाचे विशेष महत्त्व आहे. याच दिवशी भगवान विष्णूंचे सहावे अवतार भगवान परशुराम यांचा जन्मदिवस असतो. ब्रह्मदेवाचा पुत्र अक्षय याचे प्राकट्य याच दिवशी झाल्याने अक्षय तिथी म्हणून हा दिवस प्रसिद्ध पावला.
 
 
अक्षय्य तृतीया
 
 
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वर्षभरात साडेतीन शुभ मुहूर्त असतात. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा, वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया , आश्विन शुक्ल दशमी म्हणजेच विजयादशमी (दसरा) हे तीन पूर्ण मुहूर्त असून दिवाळीचा पाडवा कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा अर्धा मुहूर्त आहे. कोणत्याही शुभ कार्याचा, नवीन कार्याचा प्रारंभ या दिवशी करतात. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तातील अभिजित मुहूर्त असल्यामुळे या दिवशी इतर दिवसांप्रमाणे कोणतेही शुभ काम प्रारंभ करण्यास पंचांग बघण्याची गरज नाही.
 
पौराणिक मान्यतेनुसार अक्षय्य तृतीयेला केलेल्या पुण्यकर्माचे फळ हे अक्षय असते. या दिवशी केलेले होम, हवन, जप जाप्य आदि साधना या संपूर्ण फलप्राप्ती देणाऱ्या असतात. म्हणूनच विवाह , उपनयन, गृहप्रवेश, वस्त्रआभूषण, वाहन खरेदीसाठी अक्षय्य तृतीया शुभ मानतात. एका पौराणिक मान्यतेनुसार महाभारत काळात जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा योगेश्वर श्रीकृष्णांनी पांडवांना एक अक्षयपात्र त्यांना सप्रेम भेट दिले. या अक्षयपात्रामुळेच पांडवांना कधीही भोजन आदींची चिंता झाली नाही. श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्या मित्रप्रेमाच्या कथेलादेखील अक्षय्य तृतीयेचा संदर्भ आहे. त्याचे झाले असे की आपल्या परिवाराच्या आर्थिक विवंचनेमुळे सुदामा अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपला परममित्र योगेश्वर श्रीकृष्णाकडे गेला. भेट झाल्यानंतर सुदाम्याने आपल्या शिदोरीत आणलेले मूठभर पोहे श्रीकृष्णाला दिले जे मोठ्या आनंदाने गोपाळकृष्णानी खाल्ले. यानंतर श्रीकृष्णाने आपला बालमित्र सुदाम्याचे आगतस्वागत मोठ्या अमीर उमरावाप्रमाणे केले. मात्र या सगळ्या गडबडीत सुदामा आपली पारिवारिक विवंचना सांगण्यास विसरून गेला आणि काहीही न बोलताच तसाच घराकडे यायला परत निघाला. घरी येऊन पाहतो ते नवलच! आपल्या झोपडीच्या जागेवर एक आकर्षक राजमहाल आणि दारात सुदाम्याची पत्नी आणि मुले उंची वस्त्र प्रावरणे घालून स्वागताला हजर! सुदाम्याने लगेच ओळखले की योगेश्वराने मूठभर पोह्यांच्या परतफेडीसाठी हे सगळे केले आहे. याच कारणाने धन-संपत्ती लाभासाठी अक्षय्य तृतीयेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.
 
सुर्जी अंजनगाव येथील परब्रह्म महारुद्र सद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांच्या लीलाचरित्रात देखील अशाच प्रकारची घटना आपल्याला पाहावयास मिळते. एकदा गुर्जर प्रांतात गुजरात श्रीदेवनाथ महाराज यांचा प्रवास होता. त्यावेळी दर शनिवारी दत्तप्रासादिक परंपरेप्रमाणे भिक्षाटन करायचे असा देवनाथ महाराजांचा शिरस्ता होता. परंतु गुर्जर प्रांतातील राजाने साधू, फकीर, बैरागी यांच्या भिक्षेवर बंदी आणली होती. आता कसे करावे? म्हणून गाèहाणे मांडायला गुर्जर प्रांतातील गणेश मंदिरात श्रीदेवनाथ महाराज गेले. सगळी परिस्थिती श्रीगणेशाला सांगितली आणि देव, देश, धर्मासाठी कार्य करणाèया साधू संतांना तुझ्या राज्यात भिक्षा मिळत नसेल तर काय करायचे असे विचारले. पण एक नाही की दोन नाही गणेशमूर्ती बोलत नाही असे पाहून शीघ्रकवी सद्गुरू श्रीदेवनाथ महाराजांनी कमरेला म्यान असलेली तलवार गणेशावर उचलणार तोच गणेशमूर्ती तो वार चुकवण्यासाठी सर्रकन मागे सरकली आणि देवनाथांच्या झोळीत श्रीगणेशाने अक्षय मोदक टाकला.
 
यापरी गणेशासी कथित यातना
श्रीगणेशा मान्य हो नाथप्रार्थना
प्रसन्नपणी देई नाथ रमणा
अक्षयमोदक दानासी
 
समर्थ सद्गुरू श्रीमनोहरनाथ महाराज विरचित श्रीदेवनाथ लीलालहरी पारायण ग्रंथातील चौदाव्या तरंगात हा कथाभाग विस्तृतपणे आला आहे. याच मोदकामुळे श्रीनाथ महाराजांची झोळी अक्षय झाली. ही दत्तप्रासादिक अक्षयझोळी आजही सुर्जी अंजनगाव येथील श्रीनाथ पीठात विद्यमान आहे. पुढे सद्गुरू श्रीदेवनाथ महाराज यांच्या कृपाशीर्वादाने गुर्जर राजाने भिक्षा निर्बंध मागे घेतला.
अक्षय्य तृतीयेला दक्षिण भारतात युगादी तिथी संबोधतात. या दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाल्याचे मानतात. नर नारायण अवतारकथा अक्षय्य तृतीयेलाच घडली. बद्रीनाथ धाम येथील नर नारायण तपस्येमुळेच पुढे अर्जुन आणि श्रीकृष्ण यांचा अवतार झाला. महाभारताचे समापन आणि पांडवांना हस्तिनापूर साम्राज्य प्राप्ती आणि शिवशंकरांच्या जटेमध्ये निवास करणाèया भगवती गंगेचे गंगावतरण याच दिवशी झाले. मान्यतेनुसार बद्रीनाथपासून तीन किलोमीटर दूर असलेल्या माना येथील गणेश गुहेत महर्षी वेदव्यास यांनी श्रीगणेशाला महाभारत कथा सांगून ते महाकाव्य लेखन अक्षय्य तृतीयेलाच प्रारंभ केले.
 
पितरांचे स्मरण आणि तर्पण अक्षय्य तृतीयेलाच करतात. यावेळी थंड पाण्याने भरलेला मातीचा घट (कुंभ किंवा माठ) वाळा टाकून दान देण्याची पद्धत आहे. धर्मसिंधुनुसार हा उदककुंभ प्रदान करताना खालील मंत्रोच्चार करावा-
 
एष धर्मघटो दत्तो ब्रह्मविष्णुशिवात्मकः ।
अस्य प्रदानात् तृप्यन्तु पितरोऽपि पितामहाः ।।
गन्धोदकतिलैर्मिश्रं सान्नं कुम्भं फलान्वितम् ।
पितृभ्यः सम्प्रदास्यामि अक्षय्यमुपतिष्ठतु ।
ब्रह्मा, विष्णू आणि शिव ज्यात सामावले आहेत असा हा धर्मघट मी ब्राह्मणाला दान केला आहे. या दानामुळे माझे पितर आणि देवता तृप्त होवोत. गंध, उदक, तिळ, यव आणि फळे यांनी युक्त असा हा कुंभ मी पितरांसाठी देत आहे. हा कुंभ माझ्यासाठी सदा अक्षय्य (क्षय न पावणारा) ठरो.
 
गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नांगरलेल्या शेतजमिनीची मशागत अक्षय्य तृतीयेपर्यंत करून अक्षय्य तृतीयेला मातीचे आळे करून त्यात बीजारोपण करावे. यादृष्टीने पाहिल्यास अक्षय्य तृतीया हा आपल्या ऋषी आणि कृषी संस्कृतीचा संगम आहे.
हवामान आणि पीकपाण्याच्या अंदाजाच्या पद्धतीप्रमाणेच वèहाडात यासाठी भेंडवळच्या घटमांडणीची पद्धत रूढ आहे. ही घटमांडणी 350 वर्षांहून अधिक जुनी परंपरा आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ गावात होणारी घटमांडणी शेतकèयांसाठी उपयुक्त ठरणाèया पर्जन्यमान आणि पिकांच्या स्थितीवर अंदाज वर्तविते. तेव्हाच्या चंद्रभान महाराजांचा वसा त्यांच्या वंशजांनी आजही टिकवून ठेवला आहे. घटमांडणीनंतर वर्तवलेली गेलेली पीकपाणी, राजकीय आणि आर्थिक भाकिते बऱ्याचदा खरी ठरली आहेत.akshaya tritiya निव्वळ ठोकताळे असले तरी वèहाडातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आजही भेंडवळचे महत्त्व कमी झालेले नाही. अक्षय्य तृतीयेला या गावात विदर्भ, खान्देशसह अनेक भागांतून शेतकरी मुक्कामाला येऊन दुसऱ्या दिवशीच्या पहाटेची वाट पाहतात.
 
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राजाने किंवा प्रजेच्या पालनपोषणाची जबाबदारी असणाऱ्यांनी सामूहिकरीत्या राजवाड्यात किंवा सामूहिक पूजाविधीच्या ठिकाणी श्रीविष्णुसहित वैभवलक्ष्मीच्या प्रतिमेचे कृतज्ञतेचा भाव ठेवून भक्तिभावाने पूजन करावे. यामुळे प्रजा सुखी व समृद्ध होते. लक्ष्मीदेवीची कृपाच आपल्यावर होत नाही; कारण लक्ष्मीदेवी ही श्रीविष्णूची शक्ती आहे. जेथे श्रीविष्णूलाच बोलावणे नाही, तर त्याच्यासोबत किंवा त्याच्यात असणारी त्याची शक्ती कशी बरे पूजास्थळी येऊन कृपा करेल ? म्हणून कोणत्याही रूपातील श्रीलक्ष्मी पूजनाच्या वेळी श्रीविष्णूला प्रथम आवाहन करावे व नंतर श्रीलक्ष्मीलाही आवाहन करावे. त्यामुळे उपासकाला लक्ष्मीतत्त्वाचा जास्तीत जास्त लाभ होतो.
 
माता भगिनी यादिवशी सायंकाळी हळदीकुंकू आयोजित करून आंबा कैरीचे पन्हे , हरभèयाची वाटलेली डाळ देऊन चैत्रगौरीचे समापन करतात. अक्षय्य तृतीयेलाच खान्देशात आखाजी म्हणून संबोधतात. जळगाव, धुळे, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्याचा काही भागांत प्रामुख्याने अहिराणी बोली भाषा आहे. या अहिराणीत आखाजीविषयी अनेक गीते आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजनीवन, कुटुंबव्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय्य आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतीया ओळखली जाते. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांनी शब्दबद्ध केलेल्या अनेक कविता आजही आखाजी सणानिमित्त गायिल्या जातात.
 
आखाजीचा आखाजीचा
मोलाचा सन देखा जी
निंबावरी निंबावरी
बांधला छान झोका जी ।
माझा झोका माझा झोका
चालला माहेराले जी
आला झोका आला झोका
पलट सासराले जी
आखाजीनिमित्त माहेरवाशिणी झिम्मा, फुगडी, सारीपाट, उखाणे, झोपाळे यांचा मनमुराद आनंद लुटतात. भारतीय संस्कृतीमधील पारिवारिक भावनेचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे अक्षय्य तृतीया म्हणता येईल.
शरीर आणि संसारातील सर्वच वस्तू या नाशिवंत आहेत. अक्षय -अविनाशी केवळ परमात्मा आहे. अक्षय्य तृतीया हा दिवस आत्मप्रेरणा घेण्याचा मंगल दिवस आहे. अक्षय आत्मतत्त्वावर दृष्टी असतानाच देव, देश, धर्मावर अनन्य श्रद्धा ठेवून विश्वमंगल भारताचे स्वप्न याचि देही याचि डोळा बघावयास मिळो हीच अक्षय्य तृतीयेच्या मंगलपर्वावर शुभकामना. चला तर सर्वांनी मंत्रघोष करूया, अक्षयं भवति भारत सर्वमेव...
 
9657720242
(लेखक भारतीय शिक्षण मंडळाचे नागपूर महानगर मंत्री आहेत.)