प्रसूतीसाठी जाणार्‍या महिलेशी अमानविय वर्तन

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
रुग्णवाहीका चालकाच्या मनमानीचा आरोप
 
अंजनगाव सुर्जी, 
Anjangaon Rural Hospital  तालुक्यातील भंडारज येथील सोनिया रवि डोंगरे (२७) हिच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. प्रसूतीच्या कळा सुरू झाल्यानंतर वेळेवर योग्य उपचार न मिळाल्याने आणि १०२ रुग्णवाहिका चालकाच्या गैरवर्तनामुळे महिलेचे बाळ दगावल्याचा आरोप आहे.
 
 
anjan
 
सातव्या महिन्याचे गरोदर सोनिया यांना अचानक प्रसूतीकळा सुरू झाल्याने त्यांच्या आईने व शेजारच्या मावशी सोबत तिला Anjangaon Rural Hospital अंजनगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने स्थानिक वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करून तिला उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे रेफर केले. अचलपूर रुग्णालयात आशुतोष नावाचे डॉक्टर हजर असताना त्यांनी गरोदर महिलेकडे पूर्ण दुर्लक्ष केले. हजर डॉक्टरांनी कशीबशी तपासणी करून सोनिया यांना अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाकडे रेफर केले, असा आरोप महीलेच्या आईने केला आहे. १०२ अ‍ॅम्बुलन्स सेवा उपलब्ध झाल्याने सोनिया यांना त्या गाडीतून पाठवण्यात आले. अ‍ॅम्बुलन्स चालकाने भरधाव व प्रचंड वेगाने अ‍ॅम्बुलन्स चालवल्याने स्ट्रेचरवर असलेली सदर महिला दोनदा खाली पडली. सोनिया यांच्या आईने चालकाला ’दादा, आरामशीर चालवा’असे सांगितले असता चालकाने अश्लील शिव्या देऊन धमकी दिली. जास्त बोलशील तरमध्येच उतरून देईन. रात्रीची वेळ असल्याने भीतीपोटी दोघीही चूप राहिल्या. वलगाव जवळ गाडी गतिरोधकावर जोरात आदळल्याने प्रसूती महिला पुन्हा स्ट्रेचरवरून खाली पडली. प्रचंड धक्क्याने गर्भवती सोनिया यांनी अ‍ॅम्बुलन्समध्येच बाळाला जन्म दिला. मात्र चालकाने गाडी थांबवून महिलांना पांघरूणाच्या कपड्यांनी गाडी साफ करा असे सांगितले. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या गेटवर पोहोचल्यावरही सुद्धा वाहनचालकानेने पुन्हा गाडी साफ करण्यास भाग पाडले. या सगळ्या प्रकारात नवजात बाळ दगावले. सोनिया यांना बेशुद्ध अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटीत घटना शासनाच्या ‘माता-बाल मृत्यू शून्य’ मोहिमेला चपराक बसवणारी असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. गोरगरीब रुग्णांसाठी १०२ सारख्या महत्त्वाच्या सेवेत अशी मनमानी ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
 
 
चालकावर गुन्हा दाखल करा
Anjangaon Rural Hospital  काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश महासचिव तेजस अभ्यंकर यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेत जिल्हा शल्यचिकित्सकांकडे लेखी तक्रार दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा वाहनचालकावर आणि अचलपूर येथील डॉक्टरवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा अभ्यंकर यांनी दिला आहे. प्रसूती महिला व तिच्या आईनेही चालकाला सेवेतून बडतर्फ करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
 
चौकशी समिती गठीत करणार
घटनेची तात्काळ चौकशी समिती गठित करण्यात येईल. चौकशीत दोषी आढळल्यास संबंधित चालक व डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
-डॉ. विनोद पवार
जिल्हा शल्यचिकित्सक