इटली
Bergamo shooting इटलीच्या बर्गामो शहरात गुरुद्वारा परिसरात गोळीबाराची गंभीर घटना घडल्याची माहिती स्थानिक माध्यमांच्या हवाल्याने समोर येत आहे. या घटनेत दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र या वृत्ताची अधिकृत पुष्टी अद्याप स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. गुरुद्वारा माता साहिब परिसरात ही गोळीबाराची घटना घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या वेळी काही व्यक्ती गुरुद्वारातून बाहेर पडत असताना हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचा दावा स्थानिक सूत्रांकडून करण्यात आला आहे.या हल्ल्यात राजिंदर सिंह आणि गुरमीत सिंह अशी दोन भारतीय नागरिकांची नावे मृतांमध्ये असल्याचे वृत्तात म्हटले आहे. तसेच, एका अन्य व्यक्तीला गोळी लागून गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.
घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ Bergamo shooting उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून गाडीच्या सहाय्याने पलायन केले असल्याचेही प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी परिसर सील करून सखोल तपास सुरू केला असून हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मोहीम राबवली जात आहे.या घटनेमागे पूर्वनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, हल्ल्यापूर्वी काही वाद झाल्याची माहितीही समोर येत आहे. घटनास्थळावरून काही काडतुसे जप्त करण्यात आल्याचेही वृत्त आहे.दरम्यान, या घटनेमुळे स्थानिक समुदायात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, इतक्या वर्दळीच्या आणि धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी झालेल्या या हल्ल्याने सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांकडून प्रत्यक्षदर्शींची चौकशी सुरू असून संपूर्ण प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.ही घटना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय समुदायाच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा चिंता निर्माण करणारी ठरत असून, अधिकृत तपशील आणि पुष्टीची प्रतीक्षा आहे.