नवी दिल्ली,
ayush-mhatre-hamstring-injury : आयपीएल सामन्यादरम्यान चेन्नई सुपर किंग्स संघाला मोठा धक्का बसला आहे. युवा फलंदाज आयुष म्हात्रे याला हॅमस्ट्रिंगची गंभीर दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळताना तो धावताना अचानक थांबला आणि त्याला वेदना जाणवू लागल्या.
म्हात्रे चांगल्या फॉर्ममध्ये होता आणि त्याने अवघ्या १२ चेंडूंमध्ये ३० धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. मात्र दोन धावांसाठी धावताना त्याला दुखापत झाली. मैदानावरच त्याच्यावर उपचार करण्यात आले, तरीही तो खेळ सुरू ठेवत लंगडत धाव घेताना दिसला. पुढच्याच चेंडूवर मोठा फटका मारताना तो बाद झाला.
यानंतर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी यांनी सांगितले की दुखापत नेमकी किती गंभीर आहे हे तपासण्यासाठी त्याला स्कॅनसाठी नेण्यात येणार आहे. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ही दुखापत गंभीर असू शकते, असे त्यांनी म्हटले. त्यामुळे तो काही काळ संघाबाहेर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने १९४ धावा केल्या, तर चेन्नईचा संघ १८४ धावांवर थांबला आणि त्यांना १० धावांनी पराभव पत्करावा लागला. आता पुढील सामन्यात संघाला या दुखापतीचा फटका बसू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.