मेळघाटात वणव्याच्या घटनांना प्रारंभ
अमरावती,
Dharani - Patarwada route: Fire in forest धारणी - पतरवाडा मार्गावरील सेमाडोह ते घटांगपर्यंतच्या जंगलात दोन्ही बाजुने प्रचंड वणवा भडकल्याने वनसंपदेची राखरांगोळी होत आहे. वणव्याने जंगलातील तामपान वाढल्याने वन्य प्राण्यांची भटकंती सुरू झाली आहे. जंगलातला वणवा शनिवारी रात्री सुरू झाला. अत्यंत कमी संख्येने असलेले वन कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी धडपडत होते. रविवारी पण आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू होते. दरवर्षीची मेळघाटच्या जंगलात वणव्याच्या घटना होतात. फायर लाईनचे काम केल्यावरही जंगलात आग लागते, हे विशेष. उन्हाळ्यात हिरवीगार राहणारी वृक्षे, पानगळ झालेली वृक्षे व वाळलेले गवत आगीच्या विळख्यात सापडले आहे. सरपटणार्या प्राण्याना वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. नेमकी आग कशामुळे लागली हे अद्यापही समोर आले नाही.
Dharani - Patarwada route: Fire in forest पूर्वी प्रमाणे जंगलात गस्त घालण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सदर आग मानवनिर्मित असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मेळघाटातल्या जंगलात सामान्यपणे तेंदूपाने संकलनासाठी, गावाजवळ अतिक्रमण करण्यासाठी म्हणजे शेती योग्य जमीन तयार करण्यासाठी, वन्य प्राण्यांना पळविण्यासाठी आग लावली जाते. तापमान वाढल्यावर जंगलातील झाडांच्या घर्षनातूनपण आग लागत असते. याशिवाय प्रवासी किंवा पर्यंटक जळती सिगारेट, बिडी जंगलात फेकतात, त्याने सुद्धा उन्हाळ्यात आगीच्या घटना घडतात. वनविभागाकडे आगिवर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्याधुनीक उपकरणाचा पूर्णपणे अभाव आहे. तसेच प्रशिक्षित कर्मचारी सुद्धा नसल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात अडचणी येतात. जंगलातील आग विझविताना यवतमाळ येथील कर्मचार्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे.