९१.०४ टके गुण घेऊन उल्लेखनीय यश
सेलू,
Divya Kale succeeds in 10th CBSE exam अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षणाची कास धरत तालुयातील जामणी साखर कारखान्यामागील पारधी बेड्यावरील दिव्या रवी काळे हिने दहावी सीबीएसई परीक्षेत ९१.०४ टके गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे आणि तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे यांनी तिच्या घरी भेट देऊन तिचा सत्कार केला.
Divya Kale succeeds in 10th CBSE exam येळाकेळी येथील चन्नावार विद्या मंदिर येथे शिक्षण घेत असलेल्या दिव्याने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, अभ्यासासाठी आवश्यक सुविधा नसतानाही चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले. आई अश्विनी काळे यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रोत्साहनाने तिने ही भरारी घेतली आहे. दिव्याने आपल्या यशाचे श्रेय आईच्या कष्टांना देत, भविष्यात आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न व्यत केले आहे. कठोर परिश्रम आणि शिक्षणाबद्दलची तळमळ यामुळे तिच्या डोळ्यांसमोर उभी असलेली ही स्वप्नपूर्ती आता अधिक जवळ येताना दिसत आहे. दिव्याला श्रुती आणि यश अशी दोन भावंडं असून तेही शिक्षणात प्रगती करत आहेत. आईच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कुटुंब शिक्षणाकडे वाटचाल करत असल्याचे चित्र पाहायला मिळते. दिव्याच्या या यशाने केवळ तिच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण पारधी समाजालाही नवी प्रेरणा मिळाली आहे. जिद्द, मेहनत आणि शिक्षणाची आस असेल तर कोणतीही परिस्थिती अडथळा ठरू शकत नाही, हे दिव्याने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे.
संघर्षातून उभे राहिलेले स्वप्न
दिव्याची आई अश्विनी काळे यांनी सांगितले की, त्या पारधी समाजातील भटया जमातीमधून येतात. पूर्वी त्यांच्या वस्तीवर वीजसुद्धा नव्हती. शिक्षणाबाबत समाजात जागरूकता नव्हती, मात्र स्वतःच्या अपूर्ण शिक्षणाची खंत मनात ठेवून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण देण्याचा निर्धार केला. माझे शिक्षण अपूर्ण राहिले, पण माझी मुलगी आयपीएस अधिकारी होईल, हेच माझे स्वप्न आहे, असे त्या भावनिक शब्दांत म्हणाल्या.
प्रशासनाचा पुढाकार
दिव्याच्या यशाची दखल घेत सेलूच्या तहसीलदार डॉ. शकुंतला पाराजे आणि उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे यांनी तिच्या जामणी येथील घरी भेट देऊन पुष्पगुच्छ देत सत्कार केला. यावेळी त्यांनी दिव्याच्या पुढील शिक्षणासाठी आवश्यक ती आर्थिक व शैक्षणिक मदत देण्याचे आश्वासन दिले तसेच अधिकारी होण्यासाठी मार्गदर्शन करण्याची ग्वाही दिली.