नाशिकमध्ये मोठा बदल! ‘द्वारका सर्कल’ ३ महिने बंद

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
नाशिक,
dwarka-circle : नाशिकमध्ये आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू करण्यात आली आहेत. गोदावरी नदीच्या काठावर १२ नवीन घाट उभारणे, सुमारे ४०० एकर जागा आरक्षित करणे आणि विविध पायाभूत सुविधा विकसित करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. या कामांना वेग देण्यासाठी शहरातील महत्त्वाचा वाहतूक बिंदू असलेला ‘द्वारका सर्कल’ पुढील तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
 
NASHIK
 
 
आजपासून लागू झालेल्या या निर्णयानुसार, १८ जुलैपर्यंत या चौकातून कोणत्याही प्रकारची वाहतूक सुरू राहणार नाही. द्वारका सर्कल हे नाशिकचे प्रमुख प्रवेशद्वार मानले जात असल्यामुळे या बंदीचा परिणाम स्थानिक नागरिकांसोबतच बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवरही होणार आहे.
 
सध्या या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी अंडरपासचे काम सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून हे काम संथगतीने सुरू होते, मात्र कुंभमेळ्याच्या तयारीमुळे आता हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने गती वाढवली आहे.
 
या दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्ग आणि पुणे महामार्गावरून येणारी वाहतूक पर्यायी मार्गांकडे वळवण्यात आली आहे. नागरिकांनी गैरसोय टाळण्यासाठी या पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.