महिला सक्षमीकरणाची ‘स्वराली’ गाथा

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
मसाले उद्योगातून मीराची यशस्वी झेप
 
वाशीम, 
Entrepreneurship: Meera Kapse जिद्द, मेहनत आणि शासन योजनांची योग्य साथ मिळाली, तर ग्रामीण भागातील महिला केवळ स्वावलंबीच होत नाहीत, तर इतरांसाठी रोजगारनिर्मितीचे केंद्रही ठरू शकतात, याचे प्रेरणादायी उदाहरण म्हणजे कळंबा महाली येथील मीरा दीपक कापसे. ‘स्वराली’ मसाले उद्योगाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचा नवा आदर्श उभा करत त्यांनी स्वावलंबनाची यशस्वी वाटचाल घडविली आहे.
 
 
meera
 
चूल आणि मुल एवढ्यापुरतेच महिलांचे कार्यक्षेत्र मानल्या जाणार्‍या पारंपरिक चौकटीला छेद देत मीरा कापसे यांनी सुरुवातीला टेलरिंग व्यवसायातून उद्योजकतेचा पाया रचला. या माध्यमातून काही महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला. त्यानंतर रेडिमेड कपडे व साड्या विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, त्यातून अपेक्षित समाधान न मिळाल्याने त्यांनी नव्या संधीचा शोध घेतला. याच काळात वाशीम येथील आर-सेटीमध्ये उद्योजकता विकास प्रशिक्षण घेतल्याने त्यांच्या विचारांना दिशा मिळाली. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मसाले उत्पादन क्षेत्रात उतरायचे ठरविले. सुरुवातीला घरगुती पातळीवर हळद, मिरची, धने पावडर, लोणचे आणि पापड तयार करून विक्री सुरू केली. मात्र, मर्यादित साधनांमुळे नफा अल्प होता. मात्र, जिद्द कायम ठेवत त्यांनी २०२२ मध्ये १० लाखांचे बँक कर्ज घेऊन आधुनिक यंत्रसामग्री खरेदी केली आणि ‘स्वराली’ या नावाने स्वतःचा मसाले ब्रँड बाजारात आणला. योजनेअंतर्गत ३५ टक्के अनुदान मिळाल्याने उद्योगाला बळ मिळाले.
 
 
Entrepreneurship: Meera Kapse  आज ‘स्वराली’ मसाल्यांना वाशीमसह परिसरात मोठी मागणी असून, महिन्याला दीड लाख रुपयांहून अधिक उलाढाल होत आहे. त्यातून ४० ते ४५ हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळत आहे. विशेष म्हणजे या उद्योगातून गावातील आठ महिलांना रोजगार मिळाला असून, त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. २० हजारांच्या विक्रीपासून सुरू झालेली वाटचाल आज लाखोंच्या उलाढालीपर्यंत पोहोचली, हीच मीरा कापसे यांच्या चिकाटीची खरी ओळख ठरली आहे. केवळ स्वतःचा व्यवसाय उभा करण्यापुरते मर्यादित न राहता इतर महिलांनाही सक्षम करण्याचा ध्यास त्यांनी घेतला आहे. महिलांनी संधी शोधली पाहिजे, योजनांचा लाभ घेतला पाहिजे आणि स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे, असा संदेश देत मीरा कापसे भविष्यात उद्योगाचा विस्तार करून अधिक महिलांना रोजगार देण्याचा मानस व्यक्त करतात. महिला सक्षमीकरण, स्वावलंबन आणि ग्रामीण उद्योजकतेचा ‘स्वराली’ ब्रँड आज जिल्ह्यासाठी प्रेरणादायी यशोगाथा ठरत आहे.