‘कलाम वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद
वर्धा,
असाधारण आकलनशती आणि अलौकिक बुद्धिमत्तेच्या जोरावर वर्धेच्या नक्ष सूरज बन्सोड याने जागतिक स्तरावर आपल्या नावाचा डंका वाजवला आहे. नक्षच्या या विलक्षण प्रतिभेची दखल घेत प्रतिष्ठित 'Kalam World Records' ‘कलाम वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे. अडीच वर्षीय नक्षने अतिशय लहान वयातच विविध क्षेत्रांतील अफाट माहिती आत्मसात करून सर्वांनाच थक केले आहे.
त्याने वन्यप्राणी, फळे, भाज्या, मानवी शरीराचे अवयव, विविध आकार आणि रंग, १ ते २० पर्यंतचे अंक, पक्षी, लहान मुलांच्या वस्तू आणि प्राण्यांची पिल्ले यांची अचूक ओळख पटवली. एवढेच नव्हे तर ३६ विविध कृती व क्रिया, १८ खाद्यपदार्थ, २० फुले, ३० वाहने, २२ विरुद्धार्थी शब्द, घरातील व स्वयंपाकघरातील वस्तू तसेच जलचर प्राण्यांची ओळख त्याने लिलया करून दिली. त्याच्या अष्टपैलू बुद्धिमत्तेचे दर्शन बालगीते, २६ वर्णमाला, सुसंस्कार, चांगल्या सवयी, आपले मदतनीस, विविध व्यावसायिक आणि शेतातील व पाळीव प्राण्यांच्या अचूक वाचनातून घडले. त्याच्या याच अफाट क्षमतेसाठी 'Kalam World Records' कलाम वर्ल्ड रेकॉर्ड्सचे संस्थापक व अध्यक्ष टी. कुमारवेल आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. लैगिरी यांनी नक्षला सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले. नक्षच्या या यशामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत असून, वर्धेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.