येवले कुटुंबाने जल्लोषात केले स्वागत
चंद्रपूर,
Kanyaratna: Bullock cart procession मुलगा वंशाचा दिवा असतो, अशी समाजात मान्यता आहे. त्यामुळे पहिला मुलगाच व्हावा, असा सर्वसामान्यांचा अट्टाहास असतो. मुलगा झाला की कुटुंबात मोठा उत्साह संचारतो. परंतु, चंद्रपूर जिल्ह्यातील विसापूर गावातील शेतकरी येवले कुटुंबीयांनी उत्तम पायंडा रचत, आपल्या पहिल्या मुलीचे स्वागत गावात बैलबंडीहून जंगी मिरवणूक काढून केले.
मुलगीही मुलापेक्षा कमी नाही, तिचेही जल्लोषात स्वागत झालेच पाहिजे म्हणून नवजात कन्यारत्नाचे या आई-वडिलांसह बैलंबडीतून वाजतगाजत मिरवणूक काढली. या आगळ्या वेगळ्या सोहळ्याची पंचक्रोशीत सर्वत्र चर्चा आहे. समाजामध्ये काही ठिकाणी मुलीची भ्रूणहत्या केली जाते किंवा ती नकोशी म्हणून तिला दुय्यम स्थान दिले जाते. परंतु, आज खेडोपाडीही जनजागृती वाढली आहे. हळूहळू का होईना समाजाने मुलीलासुद्धा मुला एवढाच दर्जा देणे सुरू केले आहे. याची प्रचिती विसापूर येथील येवले कुटुंबीयांचा उत्साह पाहून आली.
Kanyaratna: Bullock cart procession चंदन रवींद्र येवले यांना कन्यारत्न झाल्याने तिला घरी आणण्यासाठी कुटुंबीयांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने योजना केली. नवजात मुलीची आई प्रतीक्षा हिला माहेरवरून म्हणजे गावातीलच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक येथील सदानंद क्षीरसागर यांच्या घरून आणण्यासाठी व नवजात बाळाच्या स्वागतासाठी बैलगाडीवरून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत बैलगाडीला आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांची माळ, रंगीबेरंगी अलंकार आणि पारंपरिक ढंग यामुळे हा सोहळा लक्षवेधी ठरला. अशी अनोखी मिरवणूक काढून मुलीच्या जन्माचा आनंद व्यक्त करताना कुटुंबाने सामाजिक संदेशही दिला. मुलगी हीच अभिमानाची बाब आहे, असा सकारात्मक सूर या उत्सवातून उमटला आहे.