राज्यात उष्णतेचा कहर; विदर्भात 'हीटवेव्हचा इशारा'

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
महाराष्ट्र
Vidarbha heatwave alert राज्यात एप्रिल महिन्याच्या मध्यातच उष्णतेने विक्राळ रूप धारण केले असून अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे. विशेषतः विदर्भात उष्णतेची लाट अधिक तीव्र होत असून नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे राज्यातील काही भागांत वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे राज्यावर एकाच वेळी उष्णता आणि पावसाचे दुहेरी संकट ओढावल्याचे चित्र दिसत आहे.
 

Vidarbha heatwave alert 
अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांत सर्वाधिक तापमानाची नोंद झाली असून तेथे ४४.४ अंश सेल्सिअसपर्यंत पारा पोहोचला आहे. नागपूर, वाशिम आणि गडचिरोली जिल्ह्यांतही तापमान ४४ अंशांच्या आसपास नोंदवले गेले आहे. हवामान विभागाने अमरावती, अकोला आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटेचा ‘येलो अलर्ट’ जारी केला असून पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे. उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, हलके कपडे परिधान करणे आणि उन्हात दीर्घकाळ राहणे टाळणे यांसारख्या उपाययोजना करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, लातूर, नांदेड, हिंगोली, बीड आणि धाराशिव या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यात Vidarbha heatwave alert  तापमान ४० ते ४२ अंशांदरम्यान पोहोचले असून मागील महिन्याच्या तुलनेत उष्णतेची तीव्रता लक्षणीय वाढली आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातही तापमान ४१ अंशांवर गेले असून उष्माघाताच्या घटनांना आळा घालण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात विशेष उष्माघात कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामध्ये आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून नागरिकांना तत्काळ उपचार मिळावेत, यासाठी प्रशासन सज्ज आहे.नंदूरबार जिल्ह्यातही तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना वारंवार रेशन दुकानात जावे लागू नये म्हणून प्रशासनाने एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांचे धान्य एकाच वेळी वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे तीन लाखांहून अधिक रेशनकार्डधारकांना होणार आहे.एकीकडे वाढती उष्णता आणि दुसरीकडे अवकाळी पावसाची शक्यता यामुळे राज्यातील नागरिकांसमोर दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. हवामानातील याबदलत्या स्थितीत नागरिकांनी सतर्क राहून आरोग्याची काळजी घेणे अत्यावश्यक बनले आहे.