मुंबई,
Nitesh Rane खासदार संजय राऊत यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात माझगाव न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयाने भाजपा नेते आणि मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास राज्यमंत्री नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर नितेश राणे यांना आता प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे.
या प्रकरणाची सुरुवात एका राजकीय वक्तव्यापासून झाली होती. 7 मे रोजी नितेश राणे यांनी केलेल्या विधानात त्यांनी असा दावा केला होता की, संजय राऊत लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतील. त्यांनी 10 जूनपर्यंत हा प्रवेश होईल, असेही स्पष्टपणे सांगितले होते. या विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती. मात्र, संजय राऊत यांनी हे वक्तव्य आपली सार्वजनिक बदनामी करणारे असल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली. याचिकेत राऊत यांनी म्हटले होते की, त्यांच्या राजकीय प्रतिमेला धक्का पोहोचवण्यासाठी जाणूनबुजून असे विधान करण्यात आले. त्यामुळे त्यांनी नितेश राणेंविरोधात अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला. हे प्रकरण माझगाव न्यायदंडाधिकारी न्यायालयात सुरू होते.
सुनावणीला सलग दोनदा गैरहजर
या खटल्याची सुनावणी दुसèया न्यायालयात व्हावी, अशी मागणी करत नितेश राणे यांनी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली. यानंतर न्यायालयाने दिलेल्या पुढील तारखांना नितेश राणे अनुपस्थित राहिल्याचे नोंदवण्यात आले. सलग दोनदा हजर न राहिल्यामुळे न्यायालयाने कडक भूमिका घेत त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता या प्रकरणात नवा वळण आले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.