पुणे
Bhide Bridge पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती आणि प्रसिद्ध भिडे पुलाजवळ एका अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने सोमवारी सकाळी खळबळ उडाली. नदीपात्र परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरातील सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाची अत्यंत निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. दगडाने ठेचून तसेच धारदार शस्त्राने वार करून ही हत्या करण्यात आल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. हा प्रकार पहाटेच्या सुमारास घडला असावा, असा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.घटनेची माहिती मिळताच पुणे पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा सुरू करण्यात आला असून फॉरेन्सिक तज्ज्ञांची टीमही पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे. मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांकडून विविध स्तरांवर तपास सुरू आहे.
दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. हल्लेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुराव्यांचा आधार घेतला जात आहे. या घटनेमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.पुण्यातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना गंभीर मानली जात असून पोलीस पुढील तपासात कोणते धागेदोरे हाती लागतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.