बुलढाणा,
samruddhi-highway-bus-accident : समृद्धी महामार्गावर एक धक्कादायक अपघात घडला असून, मोबाईलवर रिल्स बनवण्याच्या नादात खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, बस चालक आणि क्लिनर हे प्रवासादरम्यान मोबाईलवर व्हिडिओ तयार करण्यात व्यस्त होते, त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस पुढील वाहनावर जाऊन आदळली.
या अपघातात एका दीड वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून सुमारे २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना सकाळच्या सुमारास मेहकर टोल नाक्याजवळ घडली. अपघातानंतर तात्काळ महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
मात्र, सुरुवातीला रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे जखमींना वेळेवर उपचार मिळण्यात अडचणी आल्या, त्यामुळे नातेवाईकांनी संताप व्यक्त केला.
या घटनेमुळे पुन्हा एकदा निष्काळजीपणा आणि मोबाईल वापरामुळे होणाऱ्या अपघातांचा गंभीर प्रश्न समोर आला असून, प्रवासादरम्यान अशा प्रकारच्या कृत्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.