छत्रपती संभाजीनगर
Dr Jitendra Shelke accident छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे निघालेल्या एका कारचा समृद्धी महामार्गावर कंटेनरला झालेल्या भीषण धडकेत शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉ. जितेंद्र शेळके आणि त्यांच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून, हा अपघात आहे की घातपात, याबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना शुक्रवारी दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास घडली. डॉ. शेळके हे त्यांच्या पत्नीसह प्रवास करत असताना समृद्धी महामार्गावर त्यांची कार एका कंटेनरला धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठा भाग कंटेनरच्या मागील भागात घुसला. अपघातानंतर दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, अपघातातील Dr Jitendra Shelke accident कंटेनर चालक जमाल वारीस याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले असता त्याने आपली बाजू मांडली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, हैदराबादहून अहमदाबादकडे जात असताना कंटेनरचा रेडिएटर पाइप लिक झाल्यामुळे वाहन गरम होत होते. त्यामुळे तो हळूहळू वाहन चालवत होता. कंटेनर पूर्णपणे थांबलेला नसून तो मंद गतीने पुढे सरकत होता, त्याच वेळी मागून येणाऱ्या कारने धडक दिल्याचे त्याने सांगितले. धडकेनंतर काही क्षण काय घडले हे समजले नसल्याचेही त्याने आपल्या जबाबात नमूद केले आहे.
या घटनेनंतर डॉ. जितेंद्र शेळके यांच्या पार्श्वभूमीवरही चर्चा सुरू झाली आहे. भोंदूबाबा अशोक खरात यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच शिवनिका ट्रस्टमध्ये त्यांची उपाध्यक्ष पदावर भूमिका होती. काही दिवसांपूर्वीच भोंदूबाबा अशोक खरात यांच्यावर झालेल्या कारवाईनंतर शेळके हे तणावात असल्याचेही बोलले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, त्यांच्या नावावर आर्थिक व्यवहारांबाबत आणि काही कथित अनियमिततेबाबत आरोप करण्यात आले होते. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांची अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी झाल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या अपघातामुळे संशयाच्या चर्चा अधिक तीव्र झाल्या आहेत.दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, प्राथमिक पातळीवर हा अपघात असल्याचे स्पष्ट केले जात असले तरी सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. वाहनांची तांत्रिक तपासणी, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांवर आधारित पुढील चौकशी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, तपासानंतरच अपघातामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.