पोटनिवडणुकीवर भानामतीची दहशत

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
सांगली
election controversy सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील वड्डी गावात सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भानामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उमेदवाराच्या शेताशेजारील जागेत फोटोवर हळद-कुंकू लावून, काळ्या बाहुल्या, लिंबांना सुया टोचून आणि काळे कापड टाकून भानामती केल्याचे आढळून आले. या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
 

Sangli by-election controversy, 
वड्डी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सध्या पोटनिवडणूक सुरू असून प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या निवडणुकीत जन सुराज्य शक्ती पक्षाकडून राजू वजीर हे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. प्रचाराच्या रणधुमाळीत विविध राजकीय घडामोडी घडत असतानाच भानामतीचा हा प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. वजीर यांच्या फोटोचा वापर करून अज्ञात व्यक्तींनी करणी केल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी काळ्या बाहुल्या, केळी, लिंबू, हळद-कुंकू आणि लिंबांना टोचलेल्या सुई आढळून आल्या. या सर्व वस्तूंवर काळे कापड टाकण्यात आले होते. हा प्रकार लक्षात येताच वजीर यांच्या समर्थकांनी तातडीने तेथील भानामतीचे साहित्य पेट्रोल टाकून जाळून टाकल्याची माहिती माजी उपसरपंच कल्लपा नाईक यांनी दिली. या घटनेचा त्यांनी तीव्र निषेधही नोंदवला आहे. वजीर यांचा विजय निश्चित असल्याने विरोधकांनी घाबरून अशा प्रकारचा मार्ग अवलंबल्याचा आरोप समर्थकांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकारावर election controversy अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही प्रतिक्रिया दिली आहे. सांगली जिल्हा अध्यक्ष राहुल थोरात यांनी सांगितले की, भानामतीसारखे प्रकार हे केवळ अंधश्रद्धेवर आधारित असून लोकांमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न असतो. अशा प्रकारांना बळी न पडता नागरिकांनी विवेकाने वागावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन जादूटोणा कायद्यांतर्गत आणि निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.या घटनेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.