काँग्रेस महिलाविरोधी असल्याचा आरोप
देवरी,
देशातील महिलांना राजकारणात हक्काचे स्थान मिळावे यासाठी आणलेले महिला आरक्षण विधेयक काँग्रेसने सातत्याने हाणून पाडले आहे. काँग्रेसच्या या अडवणुकीच्या धोरणामुळेच महिलांना न्याय मिळण्यास अनेक दशके वाट पाहावी लागली. काँग्रेस पक्ष हा मुळातच महिलाविरोधी मानसिकतेचा असून, त्यांचे ढोंग आता समस्त देशवासीयांनी उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे, असा खळबळजनक आरोप भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी जि.प. सभापती Savita Puram सविता पुराम यांनी केला.
पुराम यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार केंद्रात अनेक वर्षे सत्ता उपभोगणार्या काँग्रेसने महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर केवळ राजकारण केले. जेव्हा जेव्हा हे विधेयक संसदेत आले, तेव्हा काँग्रेसने ते गांभीर्याने घेतले नाही किंवा मित्रपक्षांचे नाव पुढे करून पळवाट शोधली. महिलांचे सक्षमीकरण व्हावे, अशी काँग्रेसची कधीच प्रामाणिक इच्छा नव्हती, हे आता स्पष्ट झाले आहे. आणीबाणी लादून १९७५ मध्ये लोकशाहीचा गळा घोटणे, ही काँग्रेसची पहिली मोठी चूक होती. त्या घटनेनंतर सुरू झालेली काँग्रेसची उतरती कळा, इंदिरा गांधींच्या हत्येनंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेचा अपवाद वगळता, काँग्रेसला पुन्हा कधीच स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. आणि आता महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर विरोध करून काँग्रेसने दुसरी मोठी चूक केली आहे. देशातील ५० टक्के महिलांच्या प्रतिनिधित्वाचा प्रश्न हा केवळ राजकारणाचा विषय नाही तो न्याय, समानता आणि सशक्तिकरणाचा प्रश्न आहे. काँग्रेसच्या दिखाऊ भूमिकेची नोंद महिलांनी निश्चित घेतली आहे. जे काम काँग्रेसला ६० वर्षात जमले नाही, ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करून दाखवले. ‘नारी शक्ती वंदन अधिनियमा’द्वारे महिलांना ३३ टक्के आरक्षण देऊन भाजपने महिलांचा सन्मान केला आहे. एकीकडे मोदीजी महिलांना नेतृत्व देण्याचे काम करत आहेत, तर दुसरीकडे काँग्रेसने या प्रक्रियेत नेहमीच खोडा घालण्याचे काम केले आहे. ही बाब आता देशातील आणि राज्यातील माता-भगिनींच्या लक्षात आली आहे. त्यामुळे आगामी काळात महिलाशक्ती काँग्रेसला त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही Savita Puram सविता पुराम यांनी यावेळी दिला.