मुंबई
Kirit Somaiya मुंबईतील अनधिकृत शाळांच्या मुद्द्यावरून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या ‘स्कूल जिहाद’च्या आरोपामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेने जाहीर केलेल्या १६४ अनधिकृत शाळांच्या यादीचा संदर्भ देत सोमय्या यांनी हा गंभीर दावा केला असून, या प्रकरणाची सखोल चौकशी आणि कडक कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
सोमय्या यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या १५ ते २० वर्षांपासून मुंबईत तथाकथित ‘लँड माफिया’ सक्रिय असून ते प्रथम जमिनी बळकावतात आणि त्यानंतर त्या ठिकाणी विनापरवाना खाजगी शाळा सुरू करतात. “मुंबईत ‘लँड जिहाद’नंतर आता ‘स्कूल जिहाद’ सुरू झाला आहे,” असा दावा करत त्यांनी गोवंडी, मालाड आणि कुर्ला या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत शाळा चालवल्या जात असल्याचा आरोप केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, गोवंडीमध्ये ६५, मालाडमध्ये २५ आणि कुर्ल्यात १२ अशा शाळा असल्याचे त्यांनी नमूद केले.
या शाळांचा वापर केवळ Kirit Somaiya शिक्षणासाठी नसून काही ठिकाणी त्यांचे रूपांतर मशिदींमध्ये करून चुकीचे विचार पसरवले जात असल्याचाही आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच, मागील काही वर्षांत मुंबईत आलेल्या अवैध बांगलादेशी घुसखोरांना आश्रय देण्यासाठी आणि त्यांचे जाळे विस्तारण्यासाठी या शाळांचा उपयोग केला जात असल्याचा दावाही त्यांनी केला.मुंबई महानगरपालिकेतील कथित भ्रष्टाचारामुळेच अशा अनधिकृत शाळांना खतपाणी मिळाल्याचा आरोप करत सोमय्या यांनी या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गृह आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतल्याचे सांगितले. शिक्षण विभागाने याबाबत प्राथमिक तपास पूर्ण करून अहवाल सादर केल्याचेही त्यांनी नमूद केले.दरम्यान, पुढील आठवड्यापासून या सर्व अनधिकृत शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत सोमय्या यांनी दिले आहेत. या प्रकरणामुळे मुंबईतील शिक्षण व्यवस्था, शहरी नियोजन आणि कायदा-सुव्यवस्था याबाबत नव्याने चर्चा सुरू झाली असून विविध राजकीय पक्षांकडून यावर प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.