महावितरणच्या विरोधात आत्महत्येचा प्रयत्न

    दिनांक :19-Apr-2026
Total Views |
फाशीसाठी शेतकरी चढला झाडावर
टरबूज पिकाचे नुकसान
 
अंजनगाव सुर्जी, 
Suicide attempt against Mahavitaran अंजनगाव तालुक्यातील खोडगाव येथील शेतकरी अतुल खारोडे यांनी वीज वितरण कंपनीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने त्यांनी वीज वितरण कंपनीच्या आवारातील कडूलिंबाच्या झाडावर चढून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मिळालेल्या माहितीनुसार, खारोडे यांनी आपल्या तीन एकर शेतात टरबूज पिकाची लागवड केली होती. मात्र, रात्री साडेदहा ते सकाळी साडेतीन या वेळेत होणारा वीजपुरवठा अनेक दिवसांपासून खंडित होत असल्याने संपूर्ण पीक वाया गेले.
 

maha 
 
Suicide attempt against Mahavitaran  या आर्थिक नुकसानीमुळे हताश झालेल्या खारोडे यांनी भावनिक होत आपली व्यथा मांडली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार गजानन लवटे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ अधिकार्‍यांना बोलावून प्रश्नावर तोडगा काढण्याचे आदेश दिले. यानंतर वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता वैष्णव जाधव यांनी शेतकर्‍याला लेखी आश्वासन देत वेळेनुसार नियमित वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर अतुल खारोडे यांनी आपला आंदोलनाचा निर्णय मागे घेत झाडावरून खाली उतरले. यावेळी अंजनगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक ठाणेदार सागर भास्कर, शिवसेना शहर प्रमुख राजू अकोटकर, माजी नगरसेवक शंकर मालठाणे, जिल्हा उपप्रमुख महेंद्र दिपटे, विकास येवले तसेच सरपंच योगेश नेमाडे, उपसरपंच शुभम वाघ आणि परिसरातील अनेक शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून यापुढे वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, असे स्पष्ट आश्वासन देण्यात आल्याची माहिती अधिकार्‍यांनी दिली आहे.