- तज्ज्ञांनी उलगडले राज्युलाचे अंतरंग
- दै. तरुण भारतचा शताब्दी निमित्त अभिनव उपक्रम
पराग मगर
'Tamhan' Mahaetsv नागपूर - वैशाखाला सुरुवात हाेताच निसर्ग जणू पेटून उठताे. तप्त वारे वाहतात. पण याही वातावरणात पेटलेल्या निसर्गाला निळसर गुलाबी शांतता देणारा ताम्हण सध्या बहरला आहे. आपल्या रंगांनी वातावरणाला ताजेतवाने करणाऱ्या राज्यूल ताम्हणचा उत्सव वैशाखाच्या पहिल्या सकाळी आज गाेरक्षण चाैकाकडून काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या मार्गावरील पदपथावर रंगला. या झाडाचे महत्व आणि फुलांच्या अंतरंगांचे पदर उपस्थितांसमाेर उलगडत गेले.
निमित्त हाेते दै. तरुण भारतच्या शताब्दीनिमित्त आयाेजित ‘पावले ही ुलांची’ या उपक्रमाचे. आज(18 एप्रिल) या उपक्रमात सध्या बहरलेल्या ‘ताम्हण’ या फुलाचा आणि झाडामुळे परिचित असलेल्या गाेरक्षण ते काँग्रेसनगर या मार्गाचाही उत्सव साजरा करण्यात आला. कार्यक्रमात ऑरा कन्झर्वेशन पार्कचे संस्थापक अंबरीश घटाटे, निसर्गप्रेमी डाॅ. वृंदा जाेगळेकर, श्रीगाैरी घटाटे यांनी ताम्हण या झाडाचे शास्त्रीय आणि पर्यावरणीय दृष्ट्या असलेले महत्व समजावून सांगतानाच अनेक अज्ञात बाबी उपस्थितांना सांगितल्या. कार्यक्रमाला धनवटे नॅशनल काॅलेजचे रासेयाे समन्वयक डाॅ. राजकुमारगिरी गाेसावी आणि जनसंवाद विभाग प्रमुख नितीन कराळे यांच्यासह महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच निसर्गप्रेमी श्रीपाद रिसालदार, गिरीश जाेशी, याेगेंद्र काेठाळे, अमिता पत्की आणि साधना पत्की आवर्जून उपस्थित हाेते.
ताम्हण करताे निसर्गाला समृद्ध - घटाटे
'Tamhan' Mahaetsv अंबरीश घटाटे यांनी मार्गदर्शनात या झाडाचे औषधी महत्व विषद केले. राज्यूल असलेल्या ताम्हणीला जारूळ, बाेंद्रा, राणीचे फुल, अशा विविध नावाने ओळखले जाते. लॅगरस्ट्राेमिया स्पेसिओसा असे वैज्ञानिक नाव असेलेल्या झाडाला प्राईड ऑफ इंडिया फफ्लाॅवर असेही म्हणतात. ताम्हणाच्या पाने मधुमेह, चरबी व लघवीच्या विकारावर गुणकारी आहे. तर फुले त्वचाराेग, उष्णतेचा दाह, रक्तशुद्धीसाठी उपयाेगी आहेत. या झाडांचे खाेड टिकाऊ आणि पाण्यात सडत नसल्याने बांधकामात उपयुक्त ठरते. उन्हाळयात ही फुले बहरत असल्याने परागीकरणासाठी उपयुक्त ठरून पर्यावरणाला समृद्ध करण्यात या झाडाचे महत्व असल्याचे अंबरीश घटाटे यांनी सांगितले.
महाराष्ट्राची अस्मिता जपण्याची गरज - डाॅ जाेगळेकर
डाॅ. वृंदा जाेगळेकर यांनी हे झाड राज्यूल असल्यामागील कारणे आणि महत्व विषद करतानाच महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र अस्मिता या कवितेतून महाराष्ट्राचे झाड, प्राणी, पक्षी, फुलपाखरू, फळ आदींची लालित्यपूर्ण माहिती दिली. आपला निसर्ग हा आपला स्माभिमान आहे. ताे जपल्यास राज्याची अस्मिताही जपली जाणार असल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.
निसर्गभान जपणारा उपक्रम - डाॅ. गाेसावी
डाॅ. डाॅ. राजकुमारगिरी गाेसावी यांनी तरुण भारतच्या या उपक्रमाचे काैतुक करतानाच या माध्यमातून आजवर ज्ञान नसलेली बरीच माहिती या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह मलाही मिळाल्याचे यावेळी सांगितले. तरुण भारतचा हा उपक्रम निसर्गभान जपणारा असल्याचे ते यावेळी म्हणाले.