मुंबई,
lenskart-explanation : टिकली आणि टिळ्याबाबत सोशल मीडियावर निर्माण झालेल्या वादानंतर लेन्सकार्टचे संस्थापक आणि सीईओ पियुष बन्सल यांनी पुढे येत महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, ज्या दस्तावेजावरून वाद निर्माण झाला, तो कंपनीची अधिकृत एचआर पॉलिसी नसून एक जुनी अंतर्गत ट्रेनिंग फाइल होती आणि ती चुकीच्या संदर्भात बाहेर आली.
बंसल यांनी मान्य केले की त्या फाइलमध्ये टिकली आणि टिळ्याबाबत एक अयोग्य उल्लेख होता. मात्र ही चूक फेब्रुवारीमध्येच लक्षात आली होती आणि लगेचच तो मजकूर हटवून दुरुस्ती करण्यात आली होती. म्हणजेच हा मुद्दा सार्वजनिक होण्यापूर्वीच कंपनीने त्यावर कारवाई केली होती, असे त्यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणात चूक लवकर लक्षात न आल्याची जबाबदारी स्वीकारत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच, लेन्सकार्ट कंपनीत विविध संस्कृती, परंपरा आणि श्रद्धांचा आदर केला जातो, असे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येक कर्मचाऱ्याची ओळख जपणे आणि सर्वसमावेशक वातावरण राखणे हीच कंपनीची भूमिका असल्याचे त्यांनी पुन्हा स्पष्ट केले. या स्पष्टीकरणानंतर वाद काही प्रमाणात शांत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.