मालेगाव,
Truck-bike accident अकोला नांदेड राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ तयार करताना नागरिकांच्या सुरक्षेचा पुरेसा विचार करण्यात आला नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या मार्गावर वारंवार अपघात घडत असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. ताज्या घटनेत १८ एप्रिल रोजी रात्री १० वाजता अज्ञात ट्रकच्या धडकेत मेडशी येथील दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मेडशी बायपास येथे घडली.
Truck-bike accident प्राप्त माहितीनुसार, मेडशी येथील अजय मोहन चोथमल (वय ३०) हा रात्री आपल्या पल्सर दुचाकी क्रमांक एम. एच. ३७ एएम ४९२३ ने मेडशीहून मालेगावकडे जात होता. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरील मेडशी बायपास येथील सरपंच हॉटेलसमोरील क्रॉसिंग पॉईंटवर भरधाव अज्ञात ट्रकने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, अजय चोथमल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिक तत्काळ घटनास्थळी धावले व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच मेडशी पोलिस चौकीचे हेकॉ विनोद इंगळे तसेच पोकॉ धम्मपाल घनबहादूर घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह मालेगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. मालेगाव पोलिस अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहेत.