६८ लाख लाडक्या बहिणींची खाती बंद!

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
मुंबई,
6.8 million Accounts closed राज्यातील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेत मोठा बदल झाला आहे. सुमारे ६८ लाख लाभार्थी खात्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आवश्यक पडताळणी प्रक्रिया वेळेत पूर्ण न झाल्यामुळे ही खाती तात्पुरती बंद करण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे योजनेअंतर्गत सक्रिय लाभार्थ्यांची संख्या आता सुमारे १ कोटी ७५ लाखांपर्यंत घटली आहे.
 
6.8 million Accounts closed
 
 
३० एप्रिलपर्यंत करता येणार केवायसी
सरकारने लाभार्थ्यांची माहिती अचूक ठेवण्यासाठी ओळख पडताळणीची सक्ती केली होती. मात्र अनेकांनी ही प्रक्रिया दिलेल्या मुदतीत पूर्ण केली नाही. सुरुवातीला ३१ मार्च ही अंतिम तारीख ठरवण्यात आली होती, परंतु नागरिकांना आणखी संधी देण्यासाठी ती आता ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बंद झालेल्या काही खात्यांना पुन्हा सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.या योजनेद्वारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची मदत दिली जाते. दर महिन्याला सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी वितरित केला जातो. मात्र लाभार्थ्यांची संख्या कमी झाल्यामुळे या खर्चावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पुढील आर्थिक वर्षासाठीच्या तरतुदीतही कपात करण्यात आली आहे.
दरम्यान, काही अपात्र व्यक्तींना देखील या योजनेचा लाभ मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यात पुरुष आणि शासकीय सेवेत असलेल्या व्यक्तींचाही समावेश असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच सरकारने ही विशेष पडताळणी मोहीम राबवली. सुरुवातीच्या तपासणीत अनेकांना चुकीने अपात्र ठरवण्यात आले होते, मात्र नंतरच्या सखोल चौकशीत मोठ्या संख्येने खाती पुन्हा पात्र ठरली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांकडून आधी वितरित झालेली रक्कम परत घेण्यात येणार नसल्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसेच ही योजना बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पात्र महिलांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ सुरू ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.