अमरावती,
sahitya-bhavan : समाजातील वंचित व्यक्तींवर लिहिणार्यांची भूमिका सर्वसामान्यांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि अशा लेखक साहित्यिकांचा सन्मान झाला पाहिजे म्हणून आम्ही ही पुरस्कार योजना सुरू केली असून भविष्यात साहित्य चळवळ अधिक वृद्धिंगत व्हावी म्हणून आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ भव्य साहित्य भवन उभारणार असल्याची घोषणा माजी मंत्री प्रवीण पोटे यांनी केली.
स्व. सूर्यकांतदेवी रामचंद्र पोटे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित मातोश्री स्व.सूर्यकांतदेवी रामचंद्र पोटे राज्यस्तरीय उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. पी. आर. पोटे अभियांत्रिकी महाविद्यालय सभागृहात आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी पी. आर. पोटे एज्युकेशनल ग्रुपचे संचालक डॉ. पी. एम. खोडके हे होते तर ख्यातनाम समीक्षक डॉ. मनोज तायडे प्रमुख अतिथी म्हणून आणि संस्थेचे सचिव श्रेयस पोटे प्रामुख्याने उपस्थित होते. या सोहळ्यात झाडीबोली महर्षी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना २०२५ चा ‘साहित्यव्रती’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यात उत्कृष्ट कादंबरीसाठीचा पुरस्कार रश्मी पदवाड मदनकर, नागपूर यांना ‘कायांतर’ या कादंबरीसाठी व उत्कृष्ट कथासंग्रह पुरस्कार क्षितिज देसाई, ठाणे यांना ‘शीतपेटीतून जेव्हा जाग येते’ या कथासंग्रहासाठी देण्यात आला. रत्नागिरीच्या कविता मोरवणकर यांना ‘उद्याचा दहशतगर्द अंधार’ या कवितासंग्रहासाठी व गडचिरोली येथील प्रभू राजगडकर यांना येथे ‘आमचाही श्वास कोंडतो’ या काव्यसंग्रहासाठी पुरस्कार देण्यात आला. सोलापूरचे डॉ. शिवाजी शिंदे यांना समीक्षाग्रंथ ‘निवडक स्त्री आत्मकथने-सामाजिक सत्व आणि स्वत्व’ साठी समीक्षाग्रंथ पुरस्कार व उत्कृष्ट संपादनासाठी ‘अक्षयआंदण’ (शिवा राऊत यांची कविता) या ग्रंथासाठी ग्रंथाचे संपादक डॉ. बबन नाखले व अरूण मानकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बालवाड्.मय प्रकारात नवी मुंबईचे मोहन काळे यांना ‘चला पुन्हा शाळेत जाऊ या’ या बाल काव्यसंग्रहासाठी पुरस्कृत करण्यात आले. शिरजगाव येथील युवा कवी नितीन पर्हाड याला ‘उभरती प्रतिभा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात अमरावती जिल्ह्यातील सातत्याने लिखाण करणार्या ३५ साहित्यिकांचा गौरव करण्यात आला.