पाटणा,
AIMIM's criticism of SP उत्तर प्रदेशात येऊ घातलेल्या २०२७ च्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून विविध पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला आहे. या दरम्यान ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन म्हणजेच एआयएमआयएमने समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादवयांच्यावर गंभीर आरोप करत वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या मते, अखिलेश यादव मुस्लिम समाजाकडे दुर्लक्ष करत असून त्यांना केवळ मतांसाठी वापरतात, असा दावा करण्यात आला.
अलीकडेच अखिलेश यादव यांनी इटावा येथे मंदिर उभारणीसंदर्भातील हालचाली आणि प्रभू रामाच्या बालरूपातील मूर्ती स्थापनेचा फोटो प्रसिद्ध केला होता. या कृतीवरून राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सत्ताधारी पक्षाकडूनही टीका करण्यात आली. या पार्श्वभूमीवर एआयएमआयएमने आपला आरोप अधिक तीव्र करत समाजवादी पक्षावर निशाणा साधला. दरम्यान, या आरोपांना समाजवादी पक्षाकडून तत्काळ उत्तर देण्यात आले. घोसी मतदारसंघाचे खासदार राजीव राय यांनी या वक्तव्यांना फारसे महत्त्व देण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट केले की, निवडणुका जवळ आल्या की अशा प्रकारची विधाने नेहमीच केली जातात. अखिलेश यादव हे सर्व समाजाचे नेते आहेत आणि कोणाच्या प्रमाणपत्राची गरज त्यांना नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
राजीव राय यांनी यापूर्वीच्या निवडणुकांचा संदर्भ देत एआयएमआयएमवरही टीका केली. त्यांनी म्हटले की, या पक्षाने आधीही निवडणुका लढवल्या, परंतु त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. यावेळीही त्यांची स्थिती सुधारण्याऐवजी आणखी खालावेल, असा दावा त्यांनी केला. या सर्व घडामोडींमुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील राजकारण आणखी रंगणार असल्याचे स्पष्ट होत आहे.