प्राचीन जैन नाणी आणि टपाल तिकिटांचे अनोखे प्रदर्शन

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Ancient Jain coins and postage stamps संरक्षणम् सेवा प्रतिष्ठान आणि जैन श्वेतांबर मूर्तिपूजक श्रीसंघ यांच्या विद्यमाने, भगवान महावीर यांच्या जन्म कल्याणक निमित्त, मंगळवार, 31 मार्च रोजी केसरिया भवन येथे प्राचीन जैन नाणी आणि टपाल तिकिटांच्या आगळ्या-वेगळ्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. जैन धर्माचा प्राचीन समृद्ध इतिहास नाणी आणि टपाल तिकिटांच्या माध्यमातून जैन आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्या करिता, संग्राहक प्रमुख शुभम गंधेवार, रितेश घरडे, प्रा. मनीष वाघमारे, ओम बाक्से, सचिव हर्ष शहाडे यांनी, अध्यक्ष मकरंद जोगवार यांच्या मार्गदर्शनात या प्रदर्शनाचे आयोजन केले.
 

Ancient Jain coins  
 
जैनियांचे पहिले तीर्थंकर, प्रभू आदेश्वर यांच्यापासून ते शेवटचे, 24 वे तीर्थंकर, भगवान महावीर यांच्यापर्यंत, अनेक राजे आणि सम्राटांनी जैन धर्माप्रती आपली भक्ती व्यक्त करण्यासाठी नाण्यांवर जैन धर्माशी संबंधित चिन्हे मुद्रित केली होती. भारत सरकारने देखील, जैनीयांचे तीर्थंकर, धर्मरक्षक व प्रमुख जैन व्यक्ती, स्मारकांचा इतिहास वेळोवेळी प्रकाशित केला. ह्या सर्व वस्तूंचा संग्रह या प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन रमेश मुनोत आणि जैन मंदिराचे अध्यक्ष सुभाष जैन यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी राजेंद्र गांधी, अ‍ॅड. पंकज ओसवाल, मंदिराचे विश्वस्त वीरेंद्र मुथा, रमेश छेडा, अ‍ॅड. संजय कोचर, अनिल पुजारी, प्रशासक प्रफुल बोथरा आणि अनेक श्रावक कार्यक्रमाला उपस्थित होते.