पालकमंत्र्यांच्या हस्ते ८ उमेदवारांना नियुक्ती आदेश

*अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये नियुक्ती

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
वर्धा, 
pankaj-bhoyar : अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये खून प्रकरणाच्या पीडित कुटुंबातील सदस्यांना शासकीय नोकरी देण्याचे धोरण आहे. त्यानुसार रित जागांची उपलब्धता आणि लाभार्थी उमेदवारांच्या पात्रतेनुसार जिल्ह्यातील अनुसूचित जाती कुटुंबातील ८ उमेदवारांना पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याहस्ते शासकीय नोकरीचे नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्ह्यात पात्र ३० उमेदवारांपैकी काही नियुक्त्या इतर जिल्ह्यात देण्यात आल्या आहे.
 
 
JK
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात नियुक्ती आदेश वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., अतिरित जिल्हाधिकारी संजय तेली, समाजकल्याणचे सहाय्यक आयुत अंकेश केदार, आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प अधिकारी गितांजली निकम, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, सालोडचे उपसरपंच आशिष कुचेवार आदी उपस्थित होते.
 
 
अनुसूचित जाती जमाती या घटकातील ज्या कुटुंबात खुनासारखा गंभीर प्रकार घडलेला असतो, अशा कुटुंबातील पात्र व्यक्तीस शासकीय नोकरी देण्यात येते. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंब वार्‍यावर न सोडता त्या कुटुंबाला दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यावेळी म्हणाले. जिल्ह्यात ३० कुटुंबातील उमेदवार नोकरी मिळविण्यास पात्र आहे. यापैकी ८ उमेदवारांना वर्धा जिल्ह्यात तर चंद्रपूर २, गडचिरोली ७, भंडारा १, नागपूर १ याप्रमाणे नियुक्ती देण्यात आल्या आहेत. ११ कुटुंब अनुसूचित जमातीतील असल्याने या उमेदवारांना आदिवासी विकास विभागाच्यावतीने नियुक्त्या देण्यात येणार असल्याचेही ना. भोयर यांनी सांगितले.
 
 
नियुक्त्या देण्यात आलेल्या ८ उमेदवारांमध्ये पुजा रणधीर, राहुल वाहने, निलेश हातमोडे, स्वप्नील ओंकार, प्रगती देवतळे, विकास शंभरकर, शुभम घोरपडे, मन्टी तायवाडे या उमेदवारांचा समावेश आहे. समाजकल्याणच्या निवासी शाळा, वसतिगृहांमध्ये वेगवेगळ्या पदांवर हे उमेदवार कार्यरत राहणार आहे. प्रास्ताविक सहाय्यक आयुत अंकेश केदार यांनी केले. संचालन समाजकल्याण निरिक्षक शरद निबुदे यांनी केले. कार्यक्रमास उमेदवारांसह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.