नीरा,
Ashadhi Wari यंदा अधिकमास आल्यामुळे आषाढी वारीच्या पारंपरिक वेळापत्रकात मोठा बदल झाला असून, राज्यभरातील संतांच्या पालख्या नेहमीपेक्षा जवळपास एक महिना उशिराने श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. या बदलामुळे वारकऱ्यांच्या भेटीला उशीर होणार असला, तरी भक्तीभाव, उत्साह आणि ‘ज्ञानोबा-तुकाराम’च्या गजरात कोणतीही कमी पडणार नसल्याचे चित्र दिसत आहे.
दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिकमासामुळे यंदाच्या वारीचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. १७ मेपासून सुरू झालेला अधिकमास जूनपर्यंत चालणार असून, त्यानंतरच पालखी सोहळ्यांना सुरुवात होणार आहे. पारंपरिकरित्या जूनच्या सुरुवातीला निघणाऱ्या पालख्या यंदा २४ जूनपासून क्रमाक्रमाने पंढरपूरकडे प्रस्थान करतील.राज्यातील विविध संतांच्या पालख्यांचे प्रस्थानही त्यानुसार निश्चित करण्यात आले आहे. संत मुक्ताईंची पालखी २४ जून रोजी कोथळी-मुक्ताईनगर येथून निघणार आहे, तर संत निवृत्ती महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून मार्गस्थ होईल. संत तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून आणि संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून ७ जुलै रोजी प्रस्थान करणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ८ जुलै रोजी आळंदी येथून निघेल, तर संत सोपानदेव महाराजांची पालखी १२ जुलै रोजी सासवडहून मार्गस्थ होणार आहे.
दरम्यान, आषाढ शुद्ध Ashadhi Wari दशमी अर्थात २४ जुलै रोजी संत नामदेव महाराज पंढरपूर येथे सर्व संतांच्या पालख्यांची भेट घेणार असून, त्यानंतर २५ जुलै रोजी देवशयनी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा मोठ्या भक्तीभावात साजरा होणार आहे.पुण्यातील पालखी मुक्कामाबाबतही चर्चांना उधाण आले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पारंपरिक मुक्काम भवानी पेठ येथील विठोबा मंदिरातच ठेवावा, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. श्री अक्कलकोट स्वामी समर्थ ट्रस्टने याबाबत प्रशासनाकडे निवेदन देत, जर जागा बदलावी लागलीच तर भवानी पेठेतीलच त्यांच्या मंदिरात मुक्काम ठेवण्याचा पर्याय सुचवला आहे. येथे दर्शन व्यवस्था, रथ व्यवस्थापन, वाहनतळ तसेच इतर सोयीसुविधा उपलब्ध असल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात आला आहे.अधिक मासामुळे वेळापत्रकात बदल झाला असला तरी वारकरी संप्रदायाची शेकडो वर्षांची परंपरा आणि भक्तीचा ओघ यंदाही तितक्याच उत्साहात अनुभवायला मिळणार असल्याचे चित्र आहे.