कारंजा (घा.),
burglary-theft-incident : शहरातील वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांवर तात्काळ नियंत्रण ठेवण्याबाबत तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याबाबत पोलिस निरीक्षक प्रल्हाद मदन व कारंजा नपंचे मुख्याधिकारी विक्रम शिर्के यांना १ रोजी सामूहिक निवेदन देण्यात आले.
शहरामध्ये अलीकडे घरफोडी व चोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झालेली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. यापूर्वी २२ मार्च रोजी प्रभाग १६ मध्ये एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरांना लक्ष्य करून दोन घरांमध्ये चोरी केली व दोन घरांमध्ये चोरीचा प्रयत्न केला. ३१ मार्च रोजी रात्री पुन्हा एका घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यापूर्वीही राममंदिर परिसर व महामार्गालगतच्या किराणा दुकानात चोरीची घटना घडलेली होती. चोरटे दिवसा बंद घरांची रेकी करून रात्री नियोजनपूर्वक चोरी करीत असल्याचे सदर घटनांमधून निदर्शनास येते. एकाच रात्री अनेक घरांना लक्ष्य करण्याची धाडसी प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत आहे. घरफोडीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
प्रभाग १६ व इतर भागांमध्ये पूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे पोलिसांची गस्त तात्काळ वाढविण्यात यावी, विशेषतः रात्रीच्या वेळेत संवेदनशील भागांमध्ये वारंवार चोरी होणार्या परिसरात स्थायी पोलिस बंदोबस्त, बीट व्यवस्था मजबूत करण्यात यावी, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत नगरपंचायतीमार्फत कारवाई करण्यात यावी. नगरपंचायतीमार्फत रस्त्यावरील पथदिव्यांची व्यवस्था तात्काळ दुरुस्त व सक्षम करण्यात यावी. संशयित व्यतींवर लक्ष ठेवून गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी. नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिस-नागरिक संवाद बैठक आयोजित करण्यात यावी. सदर गंभीर परिस्थितीचा विचार करून नागरिकांच्या सुरक्षेसाठी तात्काळ ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अन्यथा नागरिकांना आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.