तुमचे अंतकरण हीच अध्यात्माची प्रयोगशाळा : डॉ. धनश्री लेले

    दिनांक :02-Apr-2026
Total Views |
कारंजा लाड,
dhanashree-lele : विज्ञानाची व्याख्या करणे सोपे आहे मात्र, अध्यात्माची कठीण आहे. विज्ञानाचे नियम बदलू शकत नाहीत म्हणजे ते सर्वत्र सारखे असतात. मात्र, अध्यात्म हे व्यक्तींच्या अनुभवावर अवलंबून असते. विज्ञानाचे प्रयोग हे प्रयोगशाळेत करता येतात तर अध्यात्मामध्ये माणसाचे अंतरंग हेच त्याची प्रयोगशाळा असते. असे प्रतिपादन मुंबई येथील प्रसिद्ध प्रवचनकार डॉ. धनश्री लेले यांनी केले.
 
 
K
 
कारंजाचे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात सुरू असलेल्या वर्धापन दिनानिमित्य १ एप्रिल रोजी अध्यात्म म्हणजे काय या विषयावर बोलत होत्या. अध्यात्मांमध्ये कर्माचा विचार करताना मी कोण? हा महत्त्वाचा प्रश्न अध्यात्मात विचारला जातो. तेव्हा आपण आपल्या अंतरंगाचा, आत्म्याचा विचार करतो. अशावेळी जीवन जगताना मोह, माया यापासून परावृत्त त्यागमाय वृती अंगीकारावी लागते. तेव्हा लक्षात येते की भौतिक सुखाच्या साधनांना धरून ठेवणे, त्यांचा मोह बाळगणे म्हणजे अध्यात्म नाही तर सोडून देणे औदार्य वृत्ती जोपासणे म्हणजे अध्यात्म असते. माणूस संसाराच्या व्यापामध्ये आरपार बुडून जातो.
 
 
संसारातील सं म्हणजे संगत ही प्रत्येकाला हवी असते. सं म्हणजे संतती ,ती वंशावाढीसाठीआवश्यक असते. सं म्हणजे संपत्ती जी उदरनिर्वाहासाठी उपयोगी ठरते. आणि शेवटी सं म्हणजे संन्यास. संसाराच्या या या सर्व गोष्टी सम्यक पणे हळूहळू बाजूला सारणे म्हणजे अध्यात्म असल्याचे त्या म्हणाल्या. विज्ञानाला तपशील आवश्यक असते मात्र अध्यात्मात तप आणि शील महत्त्वाचे ठरते. अध्यात्मामध्ये प्रत्येकाला भानावर राहावे लागते म्हणजे काटेकोर लक्ष ठेवावे लागते आपण लक्ष लक्ष जप करतो मात्र आपले लक्ष नसते. म्हणून आपल्याला जे जागे ठेवते ते अध्यात्म असते. अध्यात्मामध्ये अधून मधून स्वतःला प्रश्न विचारावे लागतात. स्वतःची जाणीव ठेवावी लागते. ही जाणीव ठेवताना जगण्यातील चुका सुधरावे लागतात. देह स्वभाव आणि आत्मा या पातळीवर आपल्याला विचार करावा लागतो हा विचार करताना आपल्याला मी ची बाधा होणार नाही याकडे लक्ष देण्याचे लेले यांनी सांगितले.
 
 
प्रकाश घुडे यांनी समारोपीय मनोगत व्यक्त केले. पारस्करताई यांनी धनश्री लेले यांचा सत्कार केला. सुशील देशपांडे यांनी संचलन केले.