सेलू, २ एप्रिल
diesel-stolen : तालुक्यातील कान्हापूर शिवारात उभ्या असलेल्या १६ चाकी ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल २३० लिटर डिझेल चोरी केल्याची धकादायक घटना १ एप्रिलच्या पहाटे उघडकीस आली आहे. या घटनेमुळे ट्रक चालकांमध्ये धडकी भरली असून ट्रकचालकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इरबा हैबत डाके (३५) रा. नांदेड हे आपल्या मालकीचा एम. एच. २६ सी. एच. ९४११ क्रमांकाचा १६ चाकी ट्रक घेऊन रायपूर येथून लोखंडी वायर बंडल भरून सांगलीकडे जात होते. ३१ मार्च रोजी रात्री त्यांनी रायपूर येथील पेट्रोल पंपावरून ३८९ लिटर डिझेल भरले होते. प्रवासादरम्यान ३१ मार्चच्या मध्यरात्रीनंतर २ वाजण्याच्या सुमारास सेलू जवळील कान्हापूर येथे झोप आल्याने त्यांनी ट्रक एका इंडियन ऑइल पेट्रोल पंपाच्या आवारात उभा करून विश्रांती घेतली. मात्र, १ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वाजता उठल्यानंतर ट्रक सुरू होत नसल्याचे लक्षात आले. तपासणी केली असता डिझेल टाकी पूर्णपणे रिकामी असल्याचे दिसून आले.
दरम्यान, पहाटे २ ते ६.३० या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ट्रकच्या टाकीतून २३० लिटर डिझेल लंपास केल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती चालकाने मलकीत सिंग यांना दिली असून, सेलू पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे.
या प्रकारामुळे महामार्गावरील वाहनचालकांमध्ये चिंता व्यत होत असून, पोलिसांनी रात्रीच्या गस्तीत वाढ करून अशा घटनांवर आळा घालण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.