मुंबई,
e-vehicle : महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवून पर्यावरणपूरक वाहतुकीला गती देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण-२०२५ अंतर्गत विविध कंपन्या आणि शहरी वाहतूक संस्थांना कोट्यवधी रुपयांचा प्रोत्साहन निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी माहिती दिली.
या निर्णयानुसार, ई-वाहनांची मागणी वाढावी आणि उत्पादनाला चालना मिळावी यासाठी काही प्रमुख वाहन उत्पादक कंपन्यांना अनुदान देण्यात आले आहे. तीनचाकी ई-वाहनांसाठी बजाज ऑटो, महिंद्रा इलेक्ट्रिक आणि यूलर मोटर्स या कंपन्यांना एकूण २.५१ कोटी रुपयांहून अधिक निधी देण्यात आला आहे.
तसेच, मुंबई, नागपूर, पुणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि ठाणे या शहरांतील सार्वजनिक वाहतूक उपक्रमांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. बेस्ट, एनएमटी, पीएमपीएल, एनएमएमटी आणि टीएमटी यांसारख्या संस्थांना मिळून सुमारे ४.५५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून, त्यामुळे शहरांमध्ये ई-बस आणि इतर पर्यावरणपूरक वाहतूक अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे.
याशिवाय, अथर एनर्जी, टीव्हीएस मोटर आणि चेतक टेक्नॉलॉजी यांसारख्या कंपन्यांनाही ई-दुचाकी आणि ई-तीनचाकी वाहनांसाठी ४.४५ कोटी रुपयांपेक्षा अधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. हा निधी २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी म्हणजेच २०२६-२७ साठीही ई-वाहनांना चालना देण्यासाठी तब्बल २४६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील ई-वाहन क्षेत्राला मोठी गती मिळणार असून, प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरणाचे संरक्षण करण्यासही मदत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.