तभा वृत्तसेवा
महागाव,
false-cases-filed-against-journalist : लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाèया पत्रकारांवर यवतमाळ जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून सूडबुद्धीने कारवाई होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. उमरखेडचे ठाणेदार शंकर पांचाळ यांनी पत्रकार अमित देशमुख यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्याचा निषेध करत, महागाव तालुका पत्रकार संघाने महागाव तहसीलदारांमार्फत पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन ठाणेदारांचे निलंबन करून फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उमरखेड येथील ‘धाडस 007’ वृत्तवाहिनीचे पत्रकार अमित देशमुख यांनी उमरखेड तालुक्यातील अवैध धंद्यांचे पितळ पुराव्यासह उघडे पाडले होते. या बातम्यांमुळे संतप्त झालेल्या ठाणेदार शंकर पांचाळ यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत देशमुख यांच्यावर सरकारी कामात अडथळा व बीएनएस अंतर्गत खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. ही कारवाई निव्वळ सूडबुद्धीने आणि अवैध धंदेवाल्यांना पाठबळ देण्यासाठी केल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे.
जर पत्रकाराने खरोखरच सरकारी कामात अडथळा आणला असेल, तर त्यावेळचे सीसीटीव्ही फूटेज पोलिसांनी तत्काळ सार्वजनिक करावे, अशी मागणी करून पत्रकार संघाने हे फूटेज समोर आल्यास ठाणेदारांचा खोटेपणा उघड होईल, असा विश्वासही व्यक्त केला.
या निवेदनाद्वारे प्रशासनाला स्पष्ट इशारा देण्यात आला की, दोषी ठाणेदारावर ठोस कारवाई झाली नाही, तर महागाव तालुका पत्रकार संघाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडले जाईल, असेही निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन नायब तहसीलदार गजानन पराते व पुरवठा निरीक्षक मोहन कोल्हे यांनी स्वीकारले.
या निवेदनावर महागाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कामारकर, उपाध्यक्ष किरण नरवाडे, सचिव रमेश देशमुख, रितेश पुरोहित, संतोष जाधव, रवी कावळे, संजय पाटे, विजय सूर्यवंशी, नीलेश नरवाडे, विशाल डहाळे, शेरखान पठाण, संजय नरवाडे, अशोक राऊत, विलास गावंडे यांच्या स्वाक्षèया आहेत.