अनिल कांबळे,
नागपूर,
kidnapping-rape-of-a-student : आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले. तिला हाॅटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी सदर पाेलिसांनी गुन्हा दाखल करून गिट्टीखदान येथील आराेपी करण केशव केसी (28) याला अटक केली.
पीडित 13 वर्षीय मुलगी रिया (काल्पनिक नाव) हिची आराेपी करणशी इन्स्टाग्रामवर ओळख झाली. तेथून त्यांची मैत्री झाली. करणने मुलीला फसवून प्रभावित करण्यास सुरुवात केली. करणच्या वडिलांचे किराणा दुकान असून ताे टाईल्स फिटींगची कामे करताे. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. दाेघांचे प्रेमसंबंध सुरु झाले. 18 मार्च राेजी दाेघांनी हाॅटेलमध्ये जाण्याचे ठरविले. ताे मुलीच्या शाळेजवळ आला. ठरल्याप्रमाणे, सकाळी 7 वाजता करणने मुलीला शाळेसमाेरून आपल्या दुचाकीवर घेऊन गेला.
तिला स्वच्छतागृहात नेले. तिथे मुलीने शाळेचा गणवेश बदलला. त्यानंतर करण मुलीला फ्रेंड्स काॅलनीतील एका हाॅटेलमध्ये घेऊन गेला. करणकडे एका तरुणीचे आधार कार्ड दाखवून तेथे खाेली बूक केली. त्याने तिच्यासाेबत लैंगिक संबंध ठेवले आणि अनैसर्गिक कृत्ये केले. त्यानंतर ताे 27 मार्च राेजी मुलीच्या शाळेत परत गेला. पूर्वीप्रमाणेच, ताे तिला दुचाकीवरून शाळेतून तिचा गणवेश बदलल्यानंतर एका हाॅटेलमध्ये घेऊन गेला आणि तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. ती वारंवार करणसाेबत फिरायला जात होती.
अशी आली घटना उघडकीस
रिया वारंवार शाळेत गैरहजर राहायला लागली. त्यामुळे तिच्या शिक्षिकेने आईला फोन करुन सांगितले. सकाळीच शाळेत पाठविल्याचे सांगताच आई चिंतेत पडली. तिने मुलीला विश्वासात घेतले. तिची चाैकशी केली असता मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला. तिची आई सदर पाेलिस ठाण्यात गेली आणि तिने तक्रार दाखल केली. पाेलिसांनी बलात्कार आणि पाॅक्साे कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून करणला अटक केली.