अग्रलेख...
kidney smuggling ‘वैद्यो नारायणो हरिः’ असे म्हणत ज्या डॉक्टरांना आपण देवाचा दर्जा देतो, ज्यांच्याकडे पाहून मरणाच्या दारात उभा असलेला रुग्णही आशेने डोळे उघडतो, त्या पांढऱ्या सदऱ्यातील काही कंटकच समाजाचे आरोग्य नासवत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्याचे शेतकरी रोशन कुळे यांची किडनी काढून त्याच्या तोंडाला पाने पुसण्याच्या भयंकर ‘रॅकेट’चा पसारा फार मोठा असल्याचे उघड झाले. त्याचे लोण केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले असताना, आता कानपुरातही अशीच किडनी तस्करी सक्रियपणे कार्यरत असल्याचे समोर आले. वारंवार उघडकीस येणारे हे विघातक कारस्थान चिंताजनक तर आहेच, शिवाय ते समाजमन सुन्न करणारेही आहे. 9.5 लाखांचे आमिष दाखवून गरिबाची किडनी काढायची आणि ती तब्बल 90 लाखांत श्रीमंतांना विकायची हा निव्वळ व्यापार नव्हे, तर जिवंत माणसांच्या अवयवाचा जाहीर लिलाव आहे. समाजाचे आरोग्य सुदृढ ठेवण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या डॉक्टरांचा यात सहभाग असणे, हे अधिकच लांच्छनास्पद आहे. कुंपणानेच शेत खाल्ल्यावर दाद तरी कोणाकडे मागायची, हा प्रश्न जेवढा विदारक, तेवढाच तो भयावह आणि क्लेशदायकही आहे. कानपूरच्या प्रकरणात एका डॉक्टर दाम्पत्यासह 10 जणांना अटक झाली आहे. तीन खाजगी रुग्णालयांचा यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. त्यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे, ज्या रुग्णालयाचा परवाना दोन महिन्यांपूर्वीच रद्द झाला होता, त्याही ठिकाणी शस्त्रक्रिया करून सर्रास किडनी काढली गेली! याचा अर्थ एवढाच की, या व्यवहारात नीतिमत्तेचा लवलेश अजिबात नाही. कायद्याची भीतीही उरलेली नाही. गरिबाची हतबलता हे अशा ‘रॅकेट’चे मोठे भांडवल आहे. कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एखादा बाप किंवा तरुण मुलगा जेव्हा नाईलाजाने स्वतःचा अवयव विकायला काढतो, तेव्हा त्याच्या असहायतेचा फायदा घेणारे, त्याला ओरबडणारे हे पांढरपेशे कसाई कोणत्याही युद्धखोर गुन्हेगारांपेक्षा, दहशतवाद्यांपेक्षा कमी दोषी नाहीत, हे समजून घेतले पाहिजे.
चंद्रपूर जिल्ह्यातील मथूर गावचा तरुण शेतकरी रोशन कुळे यांच्या किडनी विक्रीचे प्रकरण महाराष्ट्रालाच नव्हे, तर देशाला हादरा देणारे ठरले. त्या प्रकरणाच्या तपासात आंतरराष्ट्रीय जाळ्याचा पर्दाफाश झाला. या प्रकरणाचा मुख्य आरोपी रामकृष्ण सुंचू याने सापळा रचून कुळे यांच्यासह अन्य सोळा जणांच्या किडनी कंबोडियात विकल्याची माहिती पुढे आली. हा आरोपी अभियंता असला तरी त्याने या मानवी अवयवांच्या तस्करीत स्वतःचे नामाभिधानही ‘डॉ. क्रिष्णा’ असे केले होते. त्याच्यासोबतचा दलाल हिमांशी भारद्वाज यालाही अटक झाली. या संपूर्ण ‘रॅकेट’मध्ये तामिळनाडू राज्यातील त्रिचीच्या स्टार किम्स रुग्णालयाचाही सहभाग पुढे आला. रुग्णालयाचे संचालक डॉ. राजरत्नम गोविंदस्वामी यांना ‘ट्रान्झिट रिमांड’ दिल्यानंतर तेथील उच्च न्यायालयाने दिलेल्या मुदतीत त्यांना चंद्रपूरच्या न्यायालयात हजर व्हायचे होते. परंतु, ते अद्याप आलेले नाहीत. याच रुग्णालयात शस्त्रक्रिया करणारे आणखी एक आरोपी डॉ. रवींद्रपाल सिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सशर्त अटकपूर्व जामीन दिला आणि या प्रकरणी तपास करणाऱ्या विशेष पोलिस पथकासमोर बयाण नोंदवण्याची ताकीद दिली. त्यांच्या जामिनासाठी तारखांवर तारखा सुरू आहेत. येत्या 4 एप्रिलला पुढची तारीख आहे. मूळचे दिल्लीचे असलेले डॉ. रवींद्रपाल सिंग सध्या कुठे आहेत, हे कळायला मार्ग नाही. कानपूर प्रकरणात अटकेत असलेले दिल्लीचेच डॉ. इंदरपाल सिंग यांच्या आणि चंद्रपूर प्रकरणी आरोपी असलेले डॉ. रवींद्रपाल सिंग यांच्या नावात आणि गावात बरेच साधर्म्य असले तरी हे दोघेही वेगवेगळे आहेत आणि त्यांची टोळीही भिन्न आहे, असे दिसते. त्यांचा आपसात संबंध असलाच तर चौकशीत दिसेल. एकूण काय तर, अवघ्या देशात कायदा व सुव्यवस्थेच्या नाकावर टिच्चून गरिबांची किडनी काढली जात आहे. त्यांच्या हाती पाच-दहा लाख ठेवून तब्बल 80 ते 90 लाखांत त्यांची किडनी श्रीमंतांना विकली जात आहे. प्रचंड लाभाच्या या अवैध व्यापाराला थांबविण्याचा प्रयत्नही तोकडा असल्याची वास्तविक स्थिती समोर आहे. चंद्रपूर पोलिसांच्या विशेष पथकाची चमू तामिळनाडूतील त्रिचीच्या स्टार किम्स रुग्णालयात तपासासाठी गेली असता, त्यांच्याशी धक्काबुक्की झाल्याची आणि दरम्यानच्या काळात आरोपीला रफादफा केल्याची घटना पोलिस अधीक्षकांनी सांगितली आहे. हे असेच घडत नाही तर त्यामागे कुठल्यातरी मोठ्या शक्तीचा आशीर्वाद असतो, हे वेगळ्याने सांगायची गरज नाही.
देशात आणि कानपुरात हे पहिल्यांदाच घडत आहे, असेही नाही. तर यापूर्वीही अशा मानवी तस्करांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला होताच. 2020 मध्ये कानपूरचेच अवयव तस्करी प्रकरण गाजले होते. 2008 मधील गुडगावचे अमित कुमार रॅकेट असो की, अलिकडच्या काळातील नेपाळ-भारत सीमेवरील अवयव तस्करांचे जाळे असो, या साèयांची ‘मोडस ऑपरेंडी’ सारखीच आहे. ते कायम गरीब, कर्जबाजारी आणि उपेक्षित वर्गातील गरजूंना हेरतात, त्यांना आपल्या जाळ्यात ओढतात आणि पैशाचे आमिष दाखवून त्यांचे अवयव काढतात. किडनी काढून घेतल्यानंतर त्यांच्या हाती तुटपुंजी रक्कम ठेवतात आणि सहभागी दलाल, रुग्णालयाचे संचालक आणि डॉक्टर्स पीडितांच्या टाळूवरचे लोणी मोठ्या आनंदाने खातात. एकूण हा सारा प्रकार भयंकर आहे आणि तो रोखलाही जात नाही, हे त्याहून शोचनीय. ‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो’च्या आकडेवारीनुसार, मानवी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असली, तरी गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण अत्यल्पच आहे. ‘ग्लोबल फायनान्शिअल इंटिग्रिटी’च्या अहवालानुसार, जगभरातील अवयव तस्करीच्या व्यापारातून दरवर्षी अंदाजे 840 दशलक्ष ते 1.7 अब्ज इतकी मोठी उलाढाल होते. एकूण प्रत्यारोपणापैकी 10 टक्के अवयव हे तस्करीतून आलेले असतात. भारतात दरवर्षी हजारो लोक किडनी निकामी झाल्यामुळे मृत्यूशी झुंज देतात. पण त्यांना कायदेशीर दाता मिळणे दुरापास्त होते.kidney smuggling मागणी आणि पुरवठ्याचे गणित जुळत नाही. त्यातून हा काळाबाजार फोफावतो. प्रशासन आणि आरोग्य व्यवस्था असे दाते मिळवून देण्याची प्रक्रिया सोपी करण्यात अपयशी ठरते, तेव्हा ‘डॉ. क्रिष्णा’सारख्या दलालांचे आणि ‘सिंग’सारख्या डॉक्टरांचे तसेच ‘स्टार किम्स’ आणि कानपुरातील परवाना रद्द रुग्णालयांचे फावते.
आज वैद्यकीय क्षेत्राचे कमालीचे व्यावसायिकीकरण झाले आहे. रुग्णालय चालवणे हा आता सेवाधर्म न राहता तो ‘इन्व्हेस्टमेंट मॉडेल’ बनला आहे. मोठ्या ‘कॉर्पोरेट हॉस्पिटल’मध्ये रुग्णसंख्येचे, भरलेल्या खोल्यांचे आणि रुग्णांच्या आर्थिक शोषणाचे लक्ष्य (टार्गेट) दिले जाते. कानपूरचे ताजे उदाहरण घ्या, तिथे 9.5 लाखांची खरेदी आणि 90 लाखांची विक्री! यातील नफ्याचा आकडा पाहिला की कोणाचेही डोळे विस्फारतील. रुग्णाचे प्राण वाचवणे ज्यांचे कर्तव्य आहे, तेच जेव्हा मृत्यूचे दलाल बनतात, तेव्हा अशांना कठोर शिक्षा व्हायलाच हवी. त्यांच्यावर केवळ गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर त्यांची वैद्यकीय नोंदणी कायमस्वरूपी रद्द करून या ‘नोबेल प्रोफेशन’मधून कायमचे बहिष्कृत केले पाहिजे. नागभीडच्या रोशन कुळे प्रकरणाने गंभीर इशारा दिला होता, पण तो आपण गांभीर्याने घेतला नाही. आज कानपूरने पुन्हा एकदा आपल्या डोळ्यावरची पट्टी ओढून काढली आहे. तरीही यंत्रणा ढिम्मच राहिली, तर उद्या हे रॅकेट्स गल्लीबोळातील ‘नर्सिंग होम्स’पर्यंत पोहोचतील, हे गांभीर्याने समजून घेतले पाहिजे.
अखेर प्रश्न उरतो तो विश्वासार्हतेचा. समाजातील सामान्य माणूस आजही डॉक्टरांना तारणहार मानतो. पण जर वारंवार अशी प्रकरणे पुढे येत असतील, तर त्यांच्या विश्वासाला तडे जाणारच. कधीकाळी एखाद्या डॉक्टरने वाईट कृत्य केले तर ‘डॉक्टर, तुम्ही सुद्धा!’ असे मथळे वर्तमानपत्रांत छापून यायचे. पण आता- ‘डॉक्टर, तुम्ही पुन्हा पुन्हा!’ असे म्हणण्याची वेळ आली आहे...