समुद्रपूर,
marijuana-seized : कोरा येथे गांजाची विक्री करणार्या दाम्पत्याच्या घरी छापा टाकून ४ किलो गांजा, एक दुचाकी, मोबाईल, असा २ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणार्या गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेश दिले आहे. त्या अनुषंगाने अंमली पदार्थांची विक्री करणार्यांवर कारवाई करण्याची स्थानिक गुन्हे शाखेने धडक मोहीम राबविली आहे. गिरड पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्तीवर असताना कोरा येथील सराईत गांजा विक्रेता संजय कोम्पलवार याच्या घरी एनडीपीएस कायद्यान्वये छापा टाकला. संजय कोम्पलवार व त्याची पत्नी ज्ञानेश्वरी कोम्पलवार दोघेही गांजाची विक्री करताना मिळून आले. यावेळी जप्ती पंचनामा कारवाई करीत ४ किलो ५१ ग्रॅम गांजा, एम. एच. ३२ ए. झेड. ९६९० क्रमांकाची दुचाकी व मोबाईल, असा २ लाख ११ हजार ७७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद चौधरी, पोलिस उपनिरीक्षक प्रकाश लसुंते, पोलिस अंमलदार अरविंद येनुरकर, रोशन निंबोळकर, रवी पुरोहित, अभिषेक नाईक, दुर्गा सिडाम यांनी केली आहे.