गोंदिया,
leopard : नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या गोरेगाव तालुक्यातील बोडुंदा गावात मागील एक महिन्यापासून एका बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गावातील पाळीव जनावरे सतत या बिबट्याच्या हल्ल्याचे बळी ठरत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी सायंकाळ होताच नागरिक घराबाहेर पडण्यास टाळाटाळ करत असतानाच लहान मुलांना बाहेर पाठवण्यासही पालक घाबरत आहेत.
गावकर्यांच्या मते ३० मार्चच्या मध्यरात्री सुमारे ३ वाजताच्या सुमारास बिबट्याने बोडुंदा येथील शेतकरी चैनलाल पटले यांच्या जनावरांच्या गोठ्यात शिरून दोन शेळ्यांचा फडशा पाडला. या घटनेनंतर गावात आणखी भीतीचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, ही पहिलीच घटना नसून मागील एक महिन्यात अनेक जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. दररोज संध्याकाळी हा बिबट्या गावात शिरतो आणि संधी मिळताच एखाद्या जनावरावर हल्ला करतो. त्यामुळे पशुपालकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच गोरेगाव वन विभागाकडून या भागात गस्त वाढविण्यात आली आहे. तर बुधवारी रात्रीपर्यंत वन विभागाच्या पथकाकडून या बिबट्याचा शोध घेण्यात आल्याचे येथील क्षेत्र सहाय्यक तुरकर यांनी सांगितले. दरम्यान, या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी बोळूंदासह परिसरातील नागरिकांनी केली आहे.
बोडुंदा परिसर नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असल्याने वन्यप्राण्यांची ये-जा येथे कायम असते. बिबट्याला गावाच्या हद्दीतून दूर हुसकावून लावण्याचे प्रयत्न सुरू असून, तोपर्यंत ग्रामस्थांनी सतर्कता बाळगावी आणि रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी.
- मनोज गडवे, वनपरिक्षेत्राधिकारी, गोरेगाव