धारणी,
massive-fire : चिखलदरा तालुक्यातील आकी गावात बुधवारी रात्री अचानक लागलेल्या भीषण आगीत दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली असून या दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. मनकाय गनसा बेलसरे (वय ८५) असे मृतक महिलेचे नाव आहे. घटनेच्यावेळी वृद्ध महिला घरात एकटीच होती. या महिलेला दृष्टी नव्हती. तिचा नातू घरात दिवा लावून गावात मित्रांसोबत बसला होता. दरम्यान बेलसरे यांच्या घराला अचानक आग लागली.

आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण करत शेजारील दुसर्या घरालाही वेढा दिला. घटनेनंतर गावकर्यांनी तत्परता दाखवत घराघरातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला. सरपंचांनी स्वतःचा टँकर आणून मदत केली. गावकर्यांच्या अथक प्रयत्नांमुळे काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान, अचलपूर येथून अग्निशामक दलाची गाडीही घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले आणि वृद्ध महिला जळून खाक झाली. तुळशीराम गनसा बेलसरे व अजय बाबू धांडेकर यांचे घरे जळून खाक झाली. ग्रामसेवकांनी घटनेची नोंद घेतली आहे. घरकुल योजनेतून नवीन घर मंजूर करावे, अशी मागणी दोन्ही कुटुंबांनी केली आहे.