नवी दिल्ली,
Messi did not come to India केरळचे क्रीडा मंत्री व्ही. अब्दुरहिमान यांनी अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय फुटबॉल संघावर गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील संघाने केरळ दौर्याचे दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही आणि त्यामुळे राज्याची फसवणूक झाली आहे. मंत्र्यांनी सांगितले की, या संभाव्य दौर्यासाठी अनेक पातळ्यांवर चर्चा आणि नियोजन करण्यात आले होते. प्रायोजकांच्या मदतीने सुमारे २५० कोटी रुपयांची व्यवस्था करणे हे मोठे आव्हान होते, मात्र तीही पूर्ण करण्यात आली. तरीही अर्जेंटिना संघाने शेवटच्या टप्प्यावर आपले वचन पाळले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

अब्दुरहिमान यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत म्हटले की, असा विश्वासघात अपेक्षित नव्हता. त्यांनी असा आरोपही केला की, अर्जेंटिना संघाने इतर देशांकडूनही पैसे घेतले, मात्र नियोजित सामने खेळले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले आणि नुकसानभरपाईची मागणीही केली. या घडामोडीमुळे केरळमधील फुटबॉल चाहत्यांमध्ये मोठी निराशा पसरली आहे. राज्यात या दौर्याबद्दल प्रचंड उत्साह होता, मात्र तो आता पूर्णपणे मावळल्याचे मंत्री म्हणाले. त्यांनी आपल्या भावनाही व्यक्त करत सांगितले की, या घटनेमुळे त्यांना प्रचंड निराशा झाली आहे. यापूर्वी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केरळमध्ये मार्च २०२६ मध्ये अर्जेंटिना संघाचा प्रदर्शनी सामना होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात हा दौरा झाला नाही, त्यामुळे या प्रकरणाने आता मोठे वादळ उठवले आहे.